माथेरानमधील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

दस्तुरी नाका येथून अमन लॉज आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा महात्मा गांधी रस्त्यावर क्‍ले पेव्हर ब्लॉक लावण्याचे आणि रस्ता मजबूत करण्याचे काम सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे.

नेरळः माथेरान-गिरीस्थान पालिकेकडून विकासकामे पूर्ण व्हावीत, असा तगादा एमएमआरडीएकडे लावला जात आहे. त्यामुळे त्या कामांची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे यांनी अधिकाऱ्यांसह भेट देऊन माहिती घेतली. प्रायोगिक तत्त्वावर बनविण्यात येत असलेली प्रेक्षणीय स्थळे यांची पाहणी करतानाच शहरात येणारा मुख्य रस्ता या कामाची पाहणी केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी कामे करण्यावर एमएमआरडीए भर देईल, असे आश्‍वासन कार्यकारी अभियंत्यांनी माथेरान पालिका प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

खालूबाजाने दणाणली गावे
 
दस्तुरी नाका येथून अमन लॉज आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा महात्मा गांधी रस्त्यावर क्‍ले पेव्हर ब्लॉक लावण्याचे आणि रस्ता मजबूत करण्याचे काम सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्याचवेळी प्राधिकरणकडून शहरातील मायरा पॉईंट, हार्ट पॉईंट आणि पॅनोरमा पॉईंट या प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण केले जात आहे. या कामांचा वेग अत्यंत कमी असून, कामे वेळेत पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा माथेरान-गिरीस्थान पालिकेकडून एमएमआरडीएला केली जात आहे.

अमन लॉज ते सखाराम तुकाराम पॉईंट या भागात काळोखी येथे प्रचंड मोठा चढ-उताराचा रस्ता असल्याने प्रामुख्याने हातरिक्षाचालक तसेच हात गाडीवाले यांना गाडी ओढून नेताना प्रचंड श्रम घ्यावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन तेथील चढाव आणि उतार कमी करण्याची मागणी पालिकेने केली होती. त्या ठिकाणी काय करता येईल याचीही माहिती एमएमआरडीएकडून घेण्यात आली. सुरू असलेली कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत, अशी सूचना नगराध्यक्षांनी केली असून, त्या वेळी माथेरान-गिरीस्थान पालिकेचे गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक नरेश काळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, स्थानिक कार्यकर्ते सागर पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad- matheran-mmrda- officer visit

टॉपिकस