महामार्ग चौपदरीकरणात "गावपण' हरवतेय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

महाड-पोलादपूर मार्गावर अनेक गावे बसली असून, महामार्गालगत गावागावांत मार्ग गेले आहेत. आज या गावांतील ग्रामस्थ खरेदी-विक्रीसाठी तसेच चाकरमानी एसटी, मिनीडोरसह खासगी गाड्यांनी प्रवास करत आहेत. ठिकठिकाणी गावात ये-जा करणारे प्रवासी योग्य ठिकाणी उतरत आहेत; मात्र महामार्ग काम पूर्ण झाल्यानंतर बस थांबा शोधावा लागणार असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली

पोलादपूरः तालुक्‍यात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गामुळे विकासाला चालना मिळणार असली तरी तालुक्‍यातील अनेक गावांनी वर्षानुवर्षे जपलेले "गावपण' मात्र हरवत चालले आहे. महामार्ग चौपदरीकरणात जुन्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली आहे. गावागावांत जाणारे रस्ते आणि दुकाने, घरेही बाधित झाली आहेत. सध्या रस्त्यावरून फेरफटका मारताना गावात जाण्यासाठी मार्ग शोधावा लागत असल्याची खंत अनेक प्रवासी व्यक्त करत आहेत. चाकरमान्यांची यात मोठी अडचण होत आहे.

वालधुनी नदीचे पाणी होतेय केशरी
 
या महामार्गावर अनेक गावे वसली आहेत. वडखळ, आमटेम, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, टेमपाले, वीर, दासगाव, वहूर, नातेखिंड, नडगाव, चांढवे, पोलादपूर हद्दीतील पार्ले, लोहरे आदी गावांची ओळख पुसली जाणार आहे. चौपदरीकरण कामात अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत असल्याने तसेच माणगावच्या बाहेरून मार्ग करण्यात येणार असल्याने नव्या मार्गावरील वाहने थेट नियोजित स्थळी पोहचणार आहेत. आजमितीस अनेक वाहने लोणेरे, माणगाव, इंदापूर, कोलाड नाका, वाकण फाटा येथे थांबत आहेत; मात्र भविष्यात येथील चहा, वडे टपरीधारक यांचा व्यवसाय ठप्प होणार आहे. त्याचप्रमाणे माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
 
महाड-पोलादपूर मार्गावर अनेक गावे बसली असून, महामार्गालगत गावागावांत मार्ग गेले आहेत. आज या गावांतील ग्रामस्थ खरेदी-विक्रीसाठी तसेच चाकरमानी एसटी, मिनीडोरसह खासगी गाड्यांनी प्रवास करत आहेत. ठिकठिकाणी गावात ये-जा करणारे प्रवासी योग्य ठिकाणी उतरत आहेत; मात्र महामार्ग काम पूर्ण झाल्यानंतर बस थांबा शोधावा लागणार असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. रुंदीकरणामुळे अनेक शाळाही रस्त्याच्या जवळ आल्या आहेत. महत्त्वाची गावे, चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात येत असल्याने गावाचा विसर पडणार असल्याची खंतही वाहनचालक व्यक्त करत आहेत. 

महामार्ग चौपदरीकरणादरम्यान रस्त्यावरील झाडे तोडल्याने सर्वत्र ओसाड वाटत आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या गावांची ओळख पुसली गेली आहे. अनेकांना गाव कळेनासे झाले आहे. 
- प्रतीक शिंदे, ग्रामस्थ 

सरकारने महामार्ग चौपदरीकरण करताना पुन्हा रस्त्याच्या बाजूने झाडे लावावीत. सुंदर बगिचा तयार करावा. जागोजागी सूचनाफलक लावावे. म्हणजे गाव तसेच पर्यटनस्थळांची माहिती सर्वांना मिळेल. 
- नितेश शेलार, चाकरमानी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-poladpur-mumbai-goa road problem

टॉपिकस