वालधुनी नदीचं पाणी होतयं केशरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

एमआयडीसीतील रासायनिक केमिकल कंपन्यांचा प्रताप 

उल्हासनगर: डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) रोड विविध रंगांनी चर्चेचा विषय ठरलेला असतानाच अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात ऑरेंज तवंगाची दहशत पसरली आहे. दरम्यान, यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

वालधुनी नदीचा उगम मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मिल्ट्री तलावातून झाला. नदीच्या अंबरनाथ एमआयडीसीतून पुढे एका वृद्धाश्रमाच्या जवळून वाहणाऱ्या नदी पात्रात ऑरेंज तवंग सातत्याने दिसून येत आहे. पुढे या नदीत सांडपाणी मिसळत असल्याने पालेगाव, शिवमंदिर, उल्हासनगर, विठ्ठलवाडीमार्गे कल्याणपर्यंत नदीला गटाराचे स्वरूप आले आहे.

महत्त्वाची बातमी - आरक्षणात रखडली म्हाडाची सोडत

एकेकाळी या नदीत मासेमारी केली जात होती; मात्र केमिकल कंपन्यांचे रासायनिक पाणी आणि सांडपाण्यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आल्याने मासेमारीच इतिहासजमा झाली आहे. 

कंपन्यांकडून नोटिसा बेदखल 

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत सुमारे 40 कंपन्या असून त्यातील 12 ते 13 कंपन्या या रासायनिक केमिकलच्या आहेत. त्यातून हे ऑरेंज पाणी नदीच्या प्रवाहात समाविष्ट होते. वनशक्ती संघटनेचे अश्विन अघोर, वालधुनी जल संघटनेचे शशिकांत दायमा यांनी याबाबत तक्रारी केल्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या कंपन्यांना नोटिसादेखील बजावल्या होत्या; मात्र त्या बेदखल केल्या जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने काही वर्षांपूर्वी या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी स्थानिक महापालिका आणि एमआयडीसी यांना काही कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड तर भरला गेला नाहीच, उलट नदीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे आता या नदीकडे सरकारी यंत्रणा कधी लक्ष देतील? हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

web title : The water of the river Valdhuni is becoming saffron

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water of the river Valdhuni is becoming saffron