esakal | शिवप्रेमींमध्ये आनंद! आठ महिन्यांनंतर 'रायगड'चा रोपवे पर्यटकांसाठी खुला
sakal

बोलून बातमी शोधा

शिवप्रेमींमध्ये आनंद! आठ महिन्यांनंतर 'रायगड'चा रोपवे पर्यटकांसाठी खुला
  • रोपवेची प्रतीक्षा संपली 
  • आठ महिन्यांनंतर पर्यटक,
  • शिवप्रेंमीसाठी खुला 
  • महाड न्यायालयाचे आदेश 

शिवप्रेमींमध्ये आनंद! आठ महिन्यांनंतर 'रायगड'चा रोपवे पर्यटकांसाठी खुला

sakal_logo
By
सुनिल पाटकर

महाड : टाळेबंदीचा काळ आणि त्यानंतर जागेच्या वादात अडकल्यामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला करण्याचे आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला; मात्र रोपवे बंद होता. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत होती. आता ही गैरसोय दूर होणार आहे.

हेही वाचा - अखेर जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; परिसरात झाडेझुडपे वाढल्याने दक्ष राहण्याचे आवाहन

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला. महाराष्ट्राची अस्मिता असणारा रायगड किल्ला पाहता यावा, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, रायगडावर जाण्यासाठी 1 हजार 400 पायऱ्या आणि खडतर अंतर पायी कापावे लागत असे. आजारी, अपंग व्यक्ती या इच्छेपासून वंचित राहत होते. सर्वसामान्यांना रायगड सहज पाहता यावा यासाठी 1996 मध्ये रायगड रोपवे तयार करण्यात आला. त्यामुळे केवळ चारच मिनिटांत अनेकांना रायगडावर पोहोचणे सहज शक्‍य झाले. 

रायगड रोपवेमुळे रायगडावरील पर्यटक संख्याही झपाट्याने वाढली. परिसरात व्यवसाय वाढले; परंतु टाळेबंदीच्या काळामध्ये रायगड किल्ला आणि रोपे पर्यटकांसाठी बंद केल्यामुळे व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली होती. अनलॉकनंतर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे खुली असताना रायगड व पाचाड अशी संरक्षित स्थळे मात्र बंद होती. याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश दिले होते. किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला, तरीही रोपवे मात्र बंद होता. त्याच दरम्यान रोपवे जागेच्या वादात सापडला. हिरकणी वाडी येथे औकिरकर कुटुंबीयांनी रोपवेच्या जागेवर आपला हक्क सांगत या ठिकाणी पर्यटकांना आणि रोपवे प्रशासकांना मज्जाव केला होता. जागेच्या वादामध्ये शिवप्रेमी व पर्यटक भरडले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर रायगड रोपवे प्रशासनाने म्हणजेच जोग इंजिनीअरिंग कंपनीने रोपवे सुरू करण्याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. 

हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, प्रीतम मुंडेंचं  परिवहन मंत्र्यांना पत्र

रायगडावर येणाऱ्या पर्यटकांसह शिवप्रेमींचे हित लक्षात घेऊन महाड न्यायालयाने रायगड रोपवे खुला करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत रोपवे प्रशासनाकडून ऍड. नितीन आपटे व जयश्री दोसी यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली होती. 

रायगड रोपवेच्या जागेबाबत औकिरकर कुटुंब आणि रोपवेमध्ये असलेला वाद न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. रोपवेच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करून लवकरच तो पर्यटकांसाठी खुला केला जाईल. 
- राजेंद्र खातो,
व्यवस्थापक 

रायगड संवर्धन विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद ही नवीन रोपेसाठी करण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी लवकरच नवा रोपे उभारला जाईल. 
- खासदार संभाजीराजे,
अध्यक्ष, 
रायगड संवर्धन विकास प्राधिकरण 

Raigad ropeway opens for tourists after eight months 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )