Raigad News : घनकचरा प्रकल्‍पाविरोधात जनआक्रोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raigad News

Raigad News: घनकचरा प्रकल्‍पाविरोधात जनआक्रोश

कर्जत : गुंडगे गाव परिसरात नगर परिषदेचे डम्पिंग ग्राऊंड व घनकचरा प्रकल्प आहे. शहरातून गोळा होणारा सर्व ओला-सुका कचरा या ठिकाणी टाकण्यात येतो. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले असून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

परिणामी वातावरण प्रदूषित झाले आहे. कित्येक वर्षांपासून दुर्गंधी आणि अस्‍वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याने घनकचरा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा,

अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनी एकत्र येत घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीची स्थापना करत गुरुवारी जनआक्रोश मोर्चा काढला.

मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या वेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.

नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोर्चा रोखण्यात आला. नागरिकांनी केलेल्‍या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमला होता.

मोर्चात नगरसेवक उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका पुष्पा दगडे, वैशाली मोरे, माजी नगरसेवक दीपक मोरे, अरविंद मोरे, विद्यानंद ओव्हाळ आदी सहभागी झाले होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना मोर्चेकऱ्‍‌यांनी निवेदन दिले.

घनकचरा प्रकल्प स्थलांतर या विषयावर येत्या मासिक बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ, तसेच बायोगॅस प्रकल्प पुन्हा पूर्ववत सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.

- वैभव गारवे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

मांडलेले मुद्दे

घनकचरा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा.

परिसराचा विकास करताना दुजाभाव होत आहे.

पुरेस पाणीपुरवठा नाही.

पथदिवे नादुरुस्‍त.

अंतर्गत रस्त्‍यांची दुरवस्‍था

दोन वर्षांपासून बायोगॅस बंद

शहरातील सर्व गोळा केलेला कचरा बायोगॅस प्रकल्पात आणून प्रक्रिया करून शहरातील काही भागांतील रस्त्यांच्या पथदिव्यांसाठी वीजनिर्मिती केली जात असे.

मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प बंद असल्याने ओला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर तसाच साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रोगराईला निमंत्रण मिळत आहे.

नगर परिषद क्षेत्राबाहेरील हॉटेल, रिसॉर्टमधील ओला-सुका कचराही याच डम्‍पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत असल्‍याची नागरिकांची तक्रार आहे.