मुरबाडला रेल्वे आणणारच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मुरबाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुरबाडमध्ये रेल्वे आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन...

मुरबाड : मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारचा वाटा वेळेत देऊन येत्या सात-आठ महिन्यांत मुरबाड रेल्वेची निविदा काढून मुरबाडला रेल्वे आणणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुरबाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर कुणबी समाज हॉलमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

सरकारी गोदाम, म्हसा येथील महाविद्यालय व मुरबाड बसस्थानकाच्या इमारतीचे नूतनीकरण व विस्तारीकरण आदी कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल यंत्रणेद्वारे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार नरेंद्र पवार, ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार, नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलिस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण व वाहतूक पोलिस विभागातील मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली. २६ जुलैच्या पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी लष्कराची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. मुरबाडचे नाव पर्यटन क्षेत्रात जगाच्या नकाशावर यावे म्हणून माळशेज घाटमाथ्यावर २५ मीटर लांबीच्या स्कायवॉक प्रकल्पाला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rail service to start soon in Murbad : CM