रेल्वे अपघात ठरला फायद्याचा! 

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई : घरातून पळून गेलेल्या युवकाची तब्बल 10 वर्षांनी आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली. त्यासाठी कारणीभूत ठरला रेल्वे अपघात. जखमी झालेल्या आसिफ नसीम मोहम्मद शेखच्या नातेवाईकांचा काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे पोलिसांनी शोध घेतला. जखमी आसिफला मूळ गावी नेण्याकरताही पोलिसांनी आर्थिक मदत केली. 

मुंबई : घरातून पळून गेलेल्या युवकाची तब्बल 10 वर्षांनी आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली. त्यासाठी कारणीभूत ठरला रेल्वे अपघात. जखमी झालेल्या आसिफ नसीम मोहम्मद शेखच्या नातेवाईकांचा काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे पोलिसांनी शोध घेतला. जखमी आसिफला मूळ गावी नेण्याकरताही पोलिसांनी आर्थिक मदत केली. 

लोकल अपघातातील जखमींना रेल्वे पोलिस रुग्णालयात दाखल करतात. जखमींसह अपघातातील मृताच्या नातेवाईकांना शोधण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. त्यासाठी पोलिसांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. अशीच विशेष कामगिरी वांद्रे रेल्वे पोलिसांनी केली. 10 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाला त्याच्या नातेवाईकांकडे स्वाधीन केले. मूळचा राजस्थानच्या बनेर बहीरबट्टी गावातील रहिवासी असलेला आसिफ 10 वर्षांपूर्वी घरातून पळाला होता. बनेरमधील पोलिस ठाण्यात त्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती; मात्र आसिफ सापडला नाही. 25 नोव्हेंबरला रात्री 12.30 च्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकात लोकल अपघातात आसिफ जखमी झाला. त्याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी भाभा रुग्णालयात दाखल केले. पायाला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रियेकरता त्याला केईएम रुग्णालयात आणण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अपमृत्यू शाखेचे हेड कॉन्स्टेबल ए. एस. सय्यद आणि पोलिस नाईक संदीप नाळे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

उपचारादरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत आसिफने गावचा पत्ता "टोंग' एवढाच सांगितला होता. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी राजस्थानच्या कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि त्यांना आसिफचे छायाचित्र पाठवले. त्यावरून कोतवाली पोलिस आसिफच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले. छायाचित्रावरून आसिफला त्याच्या काकाने ओळखले. ओळख पटल्यानंतर मुंबईला कसे जायचे, असा प्रश्‍न आसिफच्या नातेवाईकांसमोर होता. स्थानिकांनी आर्थिक मदत केल्यावर नातेवाईक मुंबईत आले आणि त्यांनी आसिफची भेट घेतली. 

गावी जाण्यासाठीही पोलिसांची आर्थिक मदत 
10 वर्षांपूर्वी आसिफ शेख कंत्राटी कामाच्या प्रलोभनामुळे घर सोडून पळाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते; पण तो सापडला नाही, असे त्याच्या काकाने वांद्रे रेल्वे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नातेवाईकांना केईएम रुग्णालयात नेले. तेथे त्यांची भेट आसिफसोबत घडवून आणली. आसिफला गावी नेण्यासाठीही नातेवाईकांकडे पैसे नव्हते. पोलिसांनीच आर्थिक मदत केल्यामुळे आसिफ अखेर आपल्या मूळ गावी पोहचला. 
 

Web Title: railway accident is profitable for asif