Mumbai : रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका, विद्याविहार एक्सलेटरवर 32 लाखांचा चुराडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका, विद्याविहार एक्सलेटरवर 32 लाखांचा चुराडा

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तब्बल ३२ लाखांचा चुराडा झालेला आहे. मध्य रेल्वेचा विद्याविहार येथील पाच वर्षापूर्वी बांधण्यात आलेला एक्सलेटर नवीन रेल्वे ओव्हर पुलामुळे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकारांची चौकशी करत दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करत त्यांच्या वेतनातून झालेला ३२ लाखांचा खर्च वसूल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

रेल्वेरूळ ओलांडण्याच्या घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेच्या मुंबई विभागातील सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्यात येत आहे. तसेच मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकाचा पश्चिम येथील एक्सलेटर ३१ डिसेंबर २०१६ रोजी बांधण्यात आला होता. याकरिता मध्य रेल्वेने ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते; मात्र आता नव्या रेल्वे ओव्हर पुलामुळे एक्सलेटर तोडण्यात येणार आहे. सदर एक्सलेटर तोडण्यासाठी रेल्वेकडून दोन लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे . अधिकांश वेळी बंद असलेल्या एक्सलेटर बाबत मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की मशीनच्या खालच्या भागात पाणी घुसल्याने एक्सलेटर काही भाग क्षतिग्रस्त झाला असल्यामुळे एक्सलेटर काम करत नव्हता. पूर्व भागात दोन नवीन एक्सलेटर बसविले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

अनिल गलगली यांनी सांगितले की, विद्याविहार स्थानकाचा पश्चिम येथील एक्सलेटरची सुरुवातीला गुणवत्ता राखली गेली नाही आणि प्रस्तावित फूट ओव्हर पुलाचा विचार केला नाही. रेल्वे ओव्हर पुलाच्या बांधकामात अडथळा येत असल्याने एक्सलेटर तोडला जाणार असून तोडकामावर दोन लाखांचा खर्च करण्यात प्रस्तावित आहे. आणि एक्सलेटर बांधणीवर 30 लाख खर्च करण्यात आले आहे.

प्रस्तावित ओव्हर पुलाचे काम असतानाही एक्सलेटर बांधण्याची आवश्यकता काय होती? असा प्रश्न विचारत गलगली यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला आहे. तसेच अधिकांश वेळी एक्सलेटर बंदच असायचा. यामुळे जनतेला काहीच सुविधा मिळाली नाही उलट 32 लाखांचा चुराडा झाला आहे. याबाबत चौकशी करत दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करत त्यांच्या वेतनातून झालेला 32 लाखांचा खर्च वसूल करण्याची मागणी गलगली यांची आहे.