मुंबईतील 'हे' रेल्वे प्रकल्प रखडलेलेच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

मुंबईच्या लोकल सेवेला गती मिळावी म्हणून गतवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात तब्बल 578.7 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

मुंबई : मुंबईच्या लोकल सेवेला गती मिळावी म्हणून गतवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात तब्बल 578.7 कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु, या प्रकल्पाच्या विलंबामुळे 500 कोटींचा जादा खर्च होणार आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात फक्त निधीची घोषणा नको; तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करा, अशी मागणी मुंबईकरांनी केली होती.

महत्त्वाची बातमी - रेशन कार्ड 'आधार' ला जोडा, अन्यथा...

मागील अर्थसंकल्पात एमयूटीपी-3 ए (मुंबई नागरी परिवहन प्रकल्प)साठी फक्त 50 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या प्रकल्पाला या वर्षी तरी चालना मिळणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावरील एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) एमयूटीपी कामांना शनिवारी (ता. 1) सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक बळ मिळण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पांना 600 कोटी रुपये मिळावेत, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. त्याला अर्थसंकल्पात मंजुरी मिळू शकते, अशी माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली.

हेही वाचा - गाईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी लाच

पनवेल ते वसई नवीन उपनगरी रेल्वेमार्गाचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यालाही मंजुरी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-2, 3 आणि 3 ए कामांसाठी जुलै 2019 मधे सादर झालेल्या अर्थसंकल्पात 578 कोटी रुपये निधी मिळाला होता. त्यानंतर तेवढीच रक्कम राज्य सरकारकडूनही आली होती. 

यंदाच्या अर्थसंकल्पात पश्‍चिम व मध्य रेल्वेवरील प्रवासी सुविधांसाठी निधीची तरतूद, एमआरव्हीसीच्या वसई ते पनवेल उपनगरी मार्गाला मंजुरी आणि एमयूटीपी-2, 3 व 3 ए यांच्यासाठी 600 कोटी रुपये मंजूर होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वसई ते पनवेल उपनगरी मार्ग आणि एमयूटीपीसाठी निधीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवले आहेत, अशी माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी दिली. 

रखडलेले प्रकल्प 

 •  ठाणे-दिवा पाचवी सहावी-मार्गिका 
 • मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावा मार्ग 
 • 47 वातानुकूलित लोकल 
 • विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकरण
 •  पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग 
 • ऐरोली-कळवा रिंग रूट 
 • बेलापूर-पनवेल दुहेरी मार्गिका : 50 कोटी 
 • ठाणे-तुर्भे-वाशी पूर्व आणि पश्‍चिम मार्गिका : 10 कोटी 
 •  बेलापूर/सीवूड्‌स-उरण दुहेरी मार्गिकेचे विद्युतीकरण : 153 कोटी 
 • सीएसएमटी-पनवेल/अंधेरी हार्बर मार्गावर 12 डब्यांची लोकल : 50 कोटी 
 • पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी मार्गिका : 10 कोटी 

web title : Railway project in Mumbai halted


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway project in Mumbai halted