रायगड जिल्हातील पावसाने शेतकरी वर्ग सुखावला; भातलावणीच्या कामांना वेग

महेंद्र दुसार - सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

रायगड जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरीप सुरूच आहे. यात शुक्रवारी दुपारी पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. दमदार पडणाऱ्या पावसाने भाताच्या लावणीची कामे वेगाने सुरू आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरीप सुरूच आहे. यात शुक्रवारी दुपारी पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. दमदार पडणाऱ्या पावसाने भाताच्या लावणीची कामे वेगाने सुरू आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केला विठ्ठल-रखुमाईचा फोटो...

मान्सून सुरू झाल्यापासून शुक्रवार (ता. 17) सकाळपर्यंत 1275.56 मिमी इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद श्रीवर्धन तालुक्यात (1977 मिमी) इतकी झाली आहे, तर सर्वांत पावसाची कमी सरासरी खालापूर तालुक्यात (922) नोंदवली गेली आहे. ऐन लावणीच्या हंगामात सुरू झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्येही भात लावणीला प्राधान्य दिले आहे. रायगडमधील सत्तर टक्के भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षी लॉकडाऊन आणि अनेक शेतकरी गावाकडे आलेले असल्याने भात लावणीसाठी भासणारी मजुरांची उणीव जाणवत नाही. उर्वरित भातलावणी पुढील आठवडाभरात पूर्ण होईल, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खाडीलगतच्या खाचरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने येथील शेतकरी पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहेत. 

नागली पिकाची पन्नास टक्के लावणी झाली आहे, तर भातपिकाची लावणी साठ टक्के पूर्ण झाली आहे. सध्या पाऊस रात्रीचा पडतो, तर दिवसा याचे प्रमाण कमी असते. यामुळे शेतकऱ्यांना लावणी करण्यास सोईचे पडत आहे.
- पांडुरंग शेळके,
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे  )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains in Raigad district relieve farmers; Accelerate paddy planting work