मोदींचा मानसिक पराभव झाला; म्हणूनच ते निरुत्तर आहेत : राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत पत्रकार परिषदेला हजेरी लावली, हा त्यांचा मानसिक पराभव असून, पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद म्हणजे "मौन की बात' ठरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई : पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत पत्रकार परिषदेला हजेरी लावली, हा त्यांचा मानसिक पराभव असून, पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद म्हणजे "मौन की बात' ठरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंनी आजही या दोघांना लक्ष्य केले. पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर द्यायची हिंमत मोदी यांच्यात नसल्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेत दिसले. अमित शहा यांनाच पत्रकार परिषदेत बोलायचे होते, तर मोदी तिथे बसलेच होते कशाला, असा सवाल करीत पाच वर्षांत मोदी यांनी असे काय केलेय, की ते प्रश्‍नांना घाबरतात? असा टोलाही राज यांनी लगावला. 

मागील पाच वर्षे मोदी स्वत:च बोलत आहेत. लोकांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास ते घाबरतात. "मन की बात' करून ते स्वत:च्या मनातले सांगत आले. पण, आता पत्रकार व जनतेच्या प्रश्‍नांना त्यांच्याकडे उत्तरे नाहीत, हे पत्रकार परिषदेत दिसल्याचे राज म्हणाले. 

प्रत्येक प्रश्‍नाला पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे हात दाखवून मोदी निरुत्तर होत होते. हा त्यांचा मानसिक पराभव आहे. दादागिरी करणाऱ्या मोदी, शहा यांना आता दादागिरी काय असते, ते समजले असेल, अशी टीकाही राज यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray criticises PM Narendra Modi over press conference