Loksabha 2019 : वाजपेयींच्या अंत्ययात्रेचाही प्रचारासाठी वापर

Loksabha 2019 :  वाजपेयींच्या अंत्ययात्रेचाही प्रचारासाठी वापर

नवी मुंबई - नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरताना झालेली गर्दी दाखवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचाही भाजपने वापर केल्याची चित्रफित दाखवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.  सभांच्या अखेरच्या टप्प्यात पनवेल येथे आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते.

 नोटाबंदी जाहीर होण्याआधी आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने परदेशात छापलेल्या नोटा भारतात आणून तब्बल तीन लाख कोटी रुपयांच्या काळ्या नोटा बदलल्या. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या या आरोपाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. कपिल सिब्बल खोटे असतील तर मग भाजपवाले त्यांच्यावर गुन्हा दाखल का करत नाहीत, असा सवालही राज यांनी भाषणात केला. 

अनेक दिवसांपासून राज सभांतून भाजपच्या नेत्यांच्या घोषणांची पोलखोल करत आहेत. पनवेल येथे गुरुवारी पार पडलेल्या सभेत राज यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ या नेहमीच्या शैलीत सिब्बल यांचा व्हिडीओ न दाखवता त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मोदी सरकारच्या घोटाळ्याचे मुद्दे वाचून दाखवले. नोटाबंदी होण्याआधी आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या सहीने दोन हजार कोटी रुपयांच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या. त्या एअरफोर्सच्या विमानाने विमानतळावर आणल्या गेल्या. रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या बदल्यात घाऊकपणे खासगी व्यवहार केला. खासगी संस्थांना ‘रॉ’ आणि ‘आरबीआय’ची माणसे गुप्तपणे कामाला लावली. एकूण तीन लाख कोटी रुपये बदलण्यात आले. हे सर्व रिझर्व्ह बॅंक बेलापूर शाखा यांच्या मदतीने करण्यात आले. संजय शहाणे व्यवस्थापक इन्डस बॅंक शाखा फोर्ट यांच्या मदतीने ३२० कोटी बदलले. रबाळे येथे एमआयडीसीच्या गोदाम २५ हजार कोटी बदलण्यात आले. हे मुद्दे राज यांनी भाषणातून मांडल्यावर सर्व अवाक होऊन ऐकत होते. सिब्बल यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे अरुण जेटली व इतर नेतेही बोलले का नाहीत, असा प्रश्‍न राज यांनी उपस्थित केला. याचाच अर्थ हे सर्व खरे आहे. राज यांच्या भाषणात त्यांनी इतर सभांप्रमाणे मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचे व्हिडीओ, देशद्रोहाबाबत केलेले विधानाचे व्हिडीओ दाखवले.

उद्या बुफेच!
राज ठाकरे यांनी राज्यभरात घेतलेल्या सभा त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्‍याने आणि त्या व्हिडीओतील पोलखोल केल्यामुळे चांगल्याच गाजल्या. या सभांचा शुक्रवारी मुंबईत शेवट होत आहे. या शेवटच्या सभांमध्ये असे अनेक व्हिडीओ दाखवण्यात येणार, जेवणाची मेजवानीच (बुफेच) देणार असल्याचे राज यांनी सांगितले. एवढ्या दिवस सभांमध्ये थोडे थोडे पदार्थ मांडत आलो आहे. आता अखेरची सभा असल्यावर सर्वच पदार्थ मांडावे लागतील, असे सांगत राज यांनी उद्याच्या सभेत मोठा उलगडा करणार असल्याचा इशाराच दिला आहे.

शेतकऱ्यांची मोदींकडून फसवणूक
पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी उरण येथे जेएनपीटीच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या इरादापत्राचा समाचार घेतला. मोदींनी शेतकऱ्यांना इरादापत्र देऊन फसवणूक केली, असा आरोप राज यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com