डोंबिवली - राज्याच्या राजकारणात एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि राष्ट्रवादीचे काका पुतणे यांच्या युतीच्या जोरदार चर्चा होत असताना दुसरीकडे डोंबिवली मध्ये एका बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे हे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच या बॅनरवर एकत्र झळकले आहेत. आई गावदेवी मातेच्या यात्रेच्या निमित्ताने का होईना हे एकत्र आल्याने एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास येणार का? याविषयीच्या चर्चांना गेल्या दोन तीन दिवसांपासून उधाण आले आहे. एकीकडे राज्यात ठाकरे बंधू युतीच्या चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे पवार काका पुतणे यांच्या ही भेटीगाठीने त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.
या भेटीगाठी सुरू असतानाच डोंबिवली मोठागाव मध्ये ही आई गावदेवी जत्रेच्या निमित्ताने का होईना विधानसभा निवडणुकी पासून एकमेकांपासून दुरावलेले काका पुतणे एकत्र येणार आहेत. आई गावदेवी जत्रेच्या निमित्ताने एक बॅनर समाज माध्यमातून चांगलाच व्हायरल होत असून यावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे व जयेश म्हात्रे यांचे फोटो झळकवण्यात आले आहेत.
आई गावदेवी मातेच्या यात्रेच्या निमित्ताने गावदेवी मंदिर संस्थान मोठागाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाच्या बॅनरवर या नेत्यांचे एकत्रित फोटो लागल्याने चर्चा रंगल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना तिकीट मिळत नसल्याने नाराज होऊन त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटाचे शिव बंधन आपल्या हाती बांधले. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार चव्हाण यांच्या विरोधात उभे राहिले होते. तर शिवसेना शिंदे गटाने कल्याण ग्रामीण मधून पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते राजेश मोरे यांना तिकीट दिले.
डोंबिवली मोठागाव मध्ये माजी महापौर पुंडलिक म्हात्रे हे कट्टर राजकारणी म्हणून ओळखले जात असून एकीकडे त्यांचा पुत्र व दुसरीकडे त्यांचे शिष्य निवडणूक रिंगणात होते. दोघे ही मोठागाव चे नाव रोशन करतील अशी शक्यता बाळगली जात असतानाच दीपेश यांना मात्र निवडणूकित पराभव पत्करावा लागला होता. तर मोरे यांनी आमदारकी मिळवत मोठागावचे नाव राखले.
विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सध्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे सूत बिघडले होते. दीपेश म्हात्रे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या कोणत्याही बॅनरवर मोरे यांना स्थान देण्यात नव्हते.
तर आमदार मोरे यांनी देखील गुरू पुंडलिक म्हात्रे यांना आपल्या बॅनरवर स्थान दिले मात्र दीपेश यांचे फोटो लावले नव्हते. विधानसभा निवडणुकीचा पराभव तर दीपेश यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यात काका मोरे त्यांचे विरोधक असलेले चव्हाण यांच्याशी जवळीक साधून असल्याने त्यांची नाराजगी अजूनही दूर होत नाही.
आमदार राजेश मोरे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पुंडलिक म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता. आमचे कौटुंबिक संबंध असल्याचे त्यावेळी आमदार मोरे यांनी सांगितले होते. म्हात्रे परिवाराने देखील त्यांचे जंगी स्वागत केले होते.
यावेळी नाराजी काहीशी कमी झाल्याचे बोलले जात असले तरी जिल्हा प्रमुख दीपेश व आमदार मोरे हे कोठे ही एकत्र दिसले नाहीत. आता यात्रेच्या निमित्ताने का होईना ते एकत्र बॅनर वर दिसल्याने कार्यकर्ते चर्चा करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.