काँग्रेस अपयशाचे खापर राष्ट्रवादीवर फोडत आहे का? राम कदम यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

मुंबईत वीज जाण्यामागे घातपात असू शकतो? म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे हे अपयश आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. 

मुंबई- मुंबई आणि परिसरात सोमवारी तब्बल साडेतीन तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. यामुळे देशाची आर्थिक राजधानी काही काळासाठी ठप्प झाली होती. यावरुन आता राजकारण चांगलेच रंगले आहे. भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैऱ्या झडल्या जात असतानाच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुनही भाजपने आता काँग्रेस-राष्ट्रवादीला घेरले आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग करत एक टि्वट केले आहे. 'काँग्रेस नेते अपयशाचे खापर राष्ट्रवादीच्या डोक्यावर फोडत आहेत. राष्ट्रवादीला हे मान्य आहे का असे विचारत गृहमंत्री अनिल देशमुख यांचं अपयश, आहे का?' असा सवाल त्यांनी केला आहे. 

सोमवारी सकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागातील वीज पुरवठा अचानक ठप्प झाला होता. त्याचा सर्वच सेवांना फटका बसला होता. मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या विशेष लोकल ठप्प झाल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी यासाठी बैठकही घेतली होती. 

त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे टि्वट केले होते. त्यांच्या या टि्वटनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा- मुंबईतील वीज संकटामागे घातपाताची शक्यता, ऊर्जामंत्र्यांचे टि्वट

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी टि्वट करुन नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधला.  स्वतःची जबाबदारी झटकत काँग्रेसचे नेते अपयशाचे सर्व खापर राष्टवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माथ्यावर टाकत आहेत का? मुंबईत वीज जाण्यामागे घातपात असू शकतो? म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे हे अपयश आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram kadam slams on congress and ncp for mumbai electricity failure anil deshmukh