घरोघरी पुन्हा रामायण! `दूरदर्शन` नंबर वन वाहिनी...

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 17 April 2020

कोरोनामुळे भारतात सध्या लाॅकडाऊन आहे. देशवासींयांनी घरात कोंडून घेतले आहे. प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन व्हावे म्हणून अनेक दूरचित्र वाहिन्या नवनवी शक्कल लढवताहेत, तरीही त्यांच्यावर मात केली आहे दूरदर्शनने...

मुंबई : कोरोनामुळे भारतात सध्या लाॅकडाऊन आहे. देशवासींयांनी घरात कोंडून घेतले आहे. प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन व्हावे म्हणून अनेक दूरचित्र वाहिन्या नवनवी शक्कल लढवताहेत, तरीही त्यांच्यावर मात केली आहे दूरदर्शनने... रामायण, महाभारत आणि शक्तिमानसारख्या जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा आणून दूरदर्शन टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकाची वाहिनी ठरली आहे.

धक्कादायक : अफवेने घेतला तिघांचा बळी, चोर समजून ग्रामस्थांचा हल्ला

जुन्या गाजलेल्या मालिकांचे तब्बल तीन दशकांनंतर पुनःप्रसारण करण्याचा दूरदर्शनचा निर्णय शंभर टक्के यशस्वी ठरला आहे. टीआरपी रेटिंगमध्ये सगळ्या मनोरंजन वाहिन्यांना दूरदर्शनने मागे टाकले आहे. `रामायण` मालिका सगळ्यात लोकप्रिय मालिका ठरली आहे. पाठोपाठ `महाभारत`ने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

दूरदर्शनचे सुवर्णयुग पुन्हा अवतरले आहे, असेच म्हणावे लागेल. एके काळी दूरदर्शनच्या बहुतेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले होते. त्यानंतर हळूहळू खासगी वाहिन्या आल्या आणि दूरदर्शन काहीसे मागे पडले. मात्र, आता लाॅकडाऊनमुळे दूरदर्शनला सुगीचे दिवस पुन्हा आले आहेत. रामानंद सागर यांच्या `रामायण` आणि बी. आर. चोप्रा यांच्या `महाभारत` मालिकांनी प्रेक्षकांवर पुन्हा गारूड केले आहे. अन्य खासगी वाहिन्यांनीही आपापल्या जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सीआयडी, हम पांच आदी लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. परंतु आजच्या घडीला पहिल्या पाच लोकप्रिय मालिकांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम आहेत.

हे वाचलं का? : ना बॅण्ड, ना बाजा, ना बारात...

तिसऱ्या आठवड्यातही घौडदौड सुरू
`रामायण` आणि `महाभारत` मालिका २८ मार्चपासून सुरू झाल्या. पहिल्याच आठवड्यात त्यांना चांगला टीआरपी मिळाला. तिसऱ्या आठवड्यातही त्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे.

दूरदर्शनच्या मालिका आयकाॅनिक
दूरदर्शनचे असिस्टंट डायरेक्टर संदीप सूद म्हणाले, की दूरदर्शनच्या मालिका आयकाॅनिक आहेत आणि आजच्या पिढीलाही आपले धार्मिक ग्रंथ काय सांगत आहेत किंवा त्यामध्ये काय लिहिलेले आहे हे जाणून घेण्याची मोठी जिज्ञासा आहे. `रामायण` आणि `महाभारत` मालिका आजच्या तरुण पिढीलाही त्यामुळेच आवडत आहेत. आमच्या मालिकांमध्ये मनोरंजनाबरोबरच शिक्षण आणि माहिती मिळत असल्याने त्या संपूर्ण कुटुंबाला खिळवून ठेवतात.

हेही वाचा ः नागवेली पानांना उत्तरेतील राज्यांत बाजारपेठ

प्रेक्षकसंख्या 19 लाखांवर
प्रसारभारतीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर `इंडिया फाईट्स कोरोना विथ दूरदर्शन`सह टीआरपी नंबरची पोस्ट शेअर केली आहे. दूरदर्शन वहिनी सलग दुसऱ्यांदा टीआरपीमध्ये नंबर एक ठरली आहे. 13 आठवड्यांत दूरदर्शनची 10 लाख प्रेक्षकसंख्या होती. ती 14 आठवड्यांत 19 लाखांवर गेली आहे.

जाहिरातदारांना स्लाॅट नाही
सध्या रामायण आणि महाभारत मालिकांची वाढती लोकप्रियता पाहता अनेक जाहिरातदार आपली जाहिरात देण्यास उत्सुक आहेत. त्याकरिता ते सेकंदाचे कितीही पैसे मोजायला तयार आहेत. परंतु अशा जाहिरातदारांची निराशा होत आहे. कारण एपिसोड्सची एकूण वेळ आणि ठरलेल्या जाहिराती पाहता नव्या जाहिरातदारांना आता जागाच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ramayana and the Mahabharata serials on television hit three decades later. Doordarshan is number one channel in TRP