esakal | Mumbai : ‘ठिपक्यांची रांगोळी’निमित्त रांगोळी स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

‘ठिपक्यांची रांगोळी’निमित्त रांगोळी स्पर्धा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर ४ ऑक्टोबरपासून ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका सुरू होत असून ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे अशी नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अपूर्वा आणि शशांक असे दोघांच्या व्यक्तिरेखेचे नाव असून मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ज्ञानदा आणि चेतन यांनी याआधी बऱ्याच मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारली आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेसाठी दोघेही खूप उत्सुक आहेत

मालिकेच्या निमित्ताने ‘सकाळ’ आणि ‘स्टार प्रवाह’तर्फे अनोखी रांगोळी स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.मालिकेतील भूमिकेविषयी ज्ञानदा म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका साकारत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मालिकेची संपूर्ण टीम. अनेक दिग्गज कलाकार आणि आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी अतिशय छान पद्धतीने मला ही भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. सेटवरचे सकारात्मक वातावरण काम करण्यासाठी नवी ऊर्जा देते. अपूर्वा साकारताना तिच्या एनर्जीशी जुळवून घेणे सुरुवातीला थोडे कठीण गेले; मात्र आता हळूहळू मला सवय होत आहे.’

शशांकची व्यक्तिरेखा साकारणारा चेतन म्हणाला, ‘शशांक हा अतिशय हुशार मुलगा आहे. तो वैज्ञानिक आहे. परदेशातून कामाची संधी मिळत असली तरी कुटुंबाला सोडून त्याला तिथे जाण्याची इच्छा नाही. त्याचा आपल्या कुटुंबावर खूप जीव आहे. संस्कार आणि मूल्य जपणाऱ्या शशांकच्या आयुष्यात जेव्हा त्याच्या विरोधी विचारांची मुलगी येते, तेव्हा नेमके काय होते हे मालिकेत पाहायला मिळेल. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या नावाप्रमाणेच कथानकही नावीन्यपूर्ण आणि एकत्र कुटुंबाचे महत्त्व पटवणारे आहे.

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रूपाली गुहा आणि पिंटू गुहा यांच्या फिल्मफार्म संस्थेची असून गिरीश वसईकर या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत.

शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी मालिका ४ ऑक्टोबरपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरू होत आहे.

प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या निमित्ताने ‘सकाळ वृत्तपत्र समूहा’सोबत एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत सुंदर ठिपक्यांची रांगोळी काढून rangoli@esakal.com या ईमेल आयडीवर पाठवायची आहे. उत्कृष्ट तीन विजेत्या रांगोळ्या दिसणार आहेत मालिकेच्या ४ ते ९ ऑक्टोबरच्या भागात रात्री १० वाजता. या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा या अनोख्या स्पर्धेत भाग घेण्याची आणि ‘स्टार प्रवाह’वर झळकण्याची संधी दवडू नका. या स्पर्धेसाठी परीक्षक आहेत प्रसिद्ध चित्रकार आणि रंगावलीकार विजय टिपुगडे.

loading image
go to top