मांजरीपेक्षा दीडपट मोठा असलेला 'हा' प्राणी नेमका कोणता?

संग्रहित
संग्रहित

रोहा : पेणमधील जंगल परिसरात शनिवारी रानमांजराचे दर्शन झाले. सामान्य नागरी मांजरीपेक्षा सुमारे दीडपट मोठा असलेला हा प्राणी नेमका कोणता आहे, याबाबत निसर्गप्रेमींसह सामान्यांमध्ये उत्सुकता होती. रानमांजर हा भारतात सर्वत्र सर्रास दिसणारा प्राणी असून तो जिल्ह्यातील वन क्षेत्रात सर्रास दिसत असल्याचे खोपोली येथील वन्यजीव अभ्यासक प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. 

रानमांजरे गवताळ जमिनीवर, झुडपांतून वा नद्या, ओढे व दलदलीच्या काठच्या वेताच्या जाळ्यांतसुद्धा राहातात. डोक्‍यासह याच्या शरीराची लांबी 60 सेंमीपेक्षा थोडी जास्त; शेपूट सुमारे 30 सेंमी लांब व वजन 5-6 किलोग्रॅम असते. रानमांजराच्या विशिष्ट ठेवणीवरून ते चटकन ओळखता येते. त्याचे पाय लांब, शेपूट तुलनेने आखूड आणि डोळे फिक्कट हिरव्या रंगाचे असतात. कान तांबूस, टोकावर काळ्या केसांची रेघ; रंग भुरकट-राखी किंवा पिवळसर-करडा; शेपटीच्या टोकाकडे काळी वलये; शेपटीचे टोक काळे; पंजे फिक्कट पिवळे व तळवे काळे किंवा काळपट तपकिरी असतात. अशी माहिती आऊल्स वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव कुणाल साळुंखे यांनी दिली. 

मांसाहारी गणातील फेलिडी कुळातला हा प्राणी. याचे शास्त्रीय नाव फेलिस चाऊस असून हे उत्तर आफ्रिकेपासून नैर्ऋत्य आशिया, भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश व इंडोचायनापर्यंत आढळते. भारतात हिमालयापासून केप कामोरिनपर्यंत हे सगळीकडे आढळते.

भारतात रानमांजराच्या चार जाती आहेत. यात (1) हिमालयातील : अंगावर लोकरीसारखे दाट केस; (2) उत्तर भारताच्या सपाट प्रदेशातील : आकार लहान, शेपूट आखूड; (3) वाळवंटातील: रंग फिक्कट पिवळा, अंगावर काळे ठिपके, शेपटीवर काळी वलये; (4) दक्षिण भारतातील : आखूड केस, पाठीचा रंग भुरकट, अंगावर काळे व पांढरे ठिपके असतात. रानमांजर सामान्यतः सकाळी व संध्याकाळी बाहेर पडते. ते अतिशय चपळ असून त्याच्या मोकळ्या मैदानातील हालचाली हुबेहूब चित्त्यासारख्या असतात. छोटे सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी, कोंबड्या हे याचे भक्ष्य आहे. गावाच्या आजूबाजूला राहणारी रानमांजरे कोंबड्यांचा फडशादेखील पाडतात. 

रानमांजर हा भारतात सहज आढळणारा प्राणी आहे. रायगड जिल्ह्यात वनसंपदा चांगली असल्याने तो सहजतेने नजरेस पडतो. 
- गणेश मेहेंदळे, अध्यक्ष, आऊल्स वन्यजीव संस्था, महाड 
ranmanjar seen in the forest in the pen

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com