आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचा शिधा 

दीपक शेलार
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

"यदाकदाचित' या खुमासदार विनोद असलेल्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बुधवारी (ता. 4) संपन्न झाला. या नाटकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जात असून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी नाटकातील तमाम कलाकार खंबीरपणे उभे राहिले आहेत. 

ठाणे : आर्थिक मंदीसह महागाईचा आगडोंब उसळला असतानाच यंदा पावसामुळे ओला दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना दुसरीकडे सत्तेच्या खुर्चीसाठी राजकारण्यांची चढाओढ सुरू आहे. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना "हे देऊ, ते देऊ' अशा गमजा मारणाऱ्या या सत्तातुरांच्या डोळ्यात "यदाकदाचित रिटर्न'च्या नाट्यकर्मीनी चांगलेच अंजन घातले आहे.

रंगमंचावर जरी नाटके करीत असले, तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र या नाट्यकर्मींनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदतीचा हात देण्याचा वसा घेतला आहे. "यदाकदाचित' या खुमासदार विनोद असलेल्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बुधवारी (ता. 4) संपन्न झाला. या नाटकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जात असून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी नाटकातील तमाम कलाकार खंबीरपणे उभे राहिले आहेत. 

कलाकार म्हणून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून "रंग संयोग' निर्मित "यदाकदाचित' नाटकातील कलाकारांनी एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. 18 मेला या नाटकाचा शुभारंभ पनवेल येथे करण्यात आला होता. प्रासंगिक घटनांवर मिश्‍कील भाष्य करणारे हे नाटक अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

या नाटकाच्या माध्यमातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात मदत केली जात आहे. या वर्षात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र शेतकरी न डगमगता पुन्हा खंबीरपणे उभा राहिला पाहिजे, यासाठीच ही छोटीशी मदत असल्याचे मत नाटकाचे सहनिर्माता सुनील पुजारी यांनी व्यक्त केले. 

"यदाकदाचित' नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग असून प्रत्येक प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. नाशिक येथील "आधारतीर्थ' आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत नाट्यकर्मींकडून केली जात आहे. या मुलांना अन्नधान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य; तसेच मुलांचा पुढील शैक्षणिक खर्चदेखील नाटकाच्या माध्यमातून उचलला जात आहे. ही परंपरा अशीच पुढे अविरत सुरू ठेवण्याचा मानस नाटकाचे निर्माता दत्तात्रय घोसाळकर यांनी केला आहे. 

आत्महत्या करून प्रश्न संपत नाहीत. निदान आपल्यापाठी असलेल्या मुलाबाळांचा आणि पत्नीचा विचार करावा. या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळू लागली आहे. कर्जामुळे आई- वडिलांनी आत्महत्या केली होती. मात्र, आधारतीर्थ आश्रमात मला माय-बाप मिळाले आहेत. त्यांनी कधीच आम्हाला आई-बापाची उणीव भासू दिली नाही. 
- आकांक्षा पवार 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ration allocation to children of suicidal farmers