Ratnagiri : महामार्गाशेजारी वृक्ष लागवड कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri

Ratnagiri : महामार्गाशेजारी वृक्ष लागवड कागदावरच

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील परशुराम ते खेरशेत या चिपळूण टप्प्यात १२ हजार वृक्षांच्या लागवडीला १५ जुलैपासून प्रारंभ करण्यात येणार होता. तसे नियोजन आमदार शेखर निकम व अधिकारी, पर्यावरणप्रेमींसमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आले होते; मात्र आता जुलै, ऑगस्ट सरला, सप्टेंबरही अर्धा उलटला तरीही हे नियोजन अजूनही केवळ कागदावरचे राहिले आहे.

महामार्ग चौपदरीकरणासाठी दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या खोदाईत हजारो झाडे तोडण्यात आली. त्यामुळे निसर्गसौंदर्याने बहरलेला हा महामार्ग परिसर गेल्या चार वर्षांपासून भकास दिसू लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गालगत तोडलेल्या वृक्षांच्या जागी नव्याने कोकणच्या वातावरणात टिकतील, अशी वृक्ष लागवड करून हरित महामार्ग बनवण्याची संकल्पना जाहीर केली होती. त्यानुसार प्रत्येक कंत्राटदार कंपनीला सूचना दिल्या होत्या. येथील पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा चालवला होता. आतापर्यंत वृक्षलागवडीसंदर्भात अनेक बैठकाही झाल्या आहेत; मात्र प्रत्येकवेळी कागदावरील नियोजनाव्यतिरिक्त ठोस कार्यवाही होताना दिसलेली नाही.

चिपळूण टप्प्यातील परशुराम ते खेरशेतदरम्यान वृक्षलागवडीसंदर्भात जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या दालनात आमदार निकमांसह महामार्ग अधिकारी, पर्यावरणप्रेमी यांची बैठक झाली. यासाठी सर्वच विभागांनी पुढाकार घेण्याचा निर्धार करत १५ जुलैचा मुहूर्तदेखील काढण्यात आला.

महामार्गाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी जयंती नानेचा यांनी त्या बैठकीत सांगितले होते की, चिपळूण टप्प्यात एकूण १२ हजार २८ झाडे तोडण्यात आली. त्या जागी अडीच ते तीन वर्षांची वड, पिंपळ, जांभूळसह विविध प्रकारची मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी वृक्षलागवड १५ जुलैपासून करण्याचे नियोजन बोलून दाखवले होते. दरम्यान, ज्या भागातील चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्या भागात लागवडीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानुसार लागवडीसाठी आवश्यक वृक्ष आंध्र प्रदेशमधील राजमुंद्री येथील नर्सरीतून आणण्यात आले आहेत.

Web Title: Ratnagiri Highway Tree Cultivation Andhra Pradesh Plants Chiplun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..