लॉकडाऊनमध्ये मराठी विकिपीडिया जोमात; वाचकसंख्या दुपटीनं वाढली, 'या' लेखाला मिळाले सर्वाधिक वाचक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi wikipedia

लॉकडाऊनच्या काळात मुबलक वेळ असल्याने लोकांनी ऑनलाईन वाचन आणि लेखन करण्यास प्राधान्य दिले. दरवर्षी मार्च ते जून या उन्हाळी सुटहीच्या काळात मराठी विकिपीडियाची वाचकसंख्या वर्षातील किमान पातळीवर असते. या वर्षी लॉकडाऊनमुळे मराठी विकिपीडिया वाचकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 38 टक्क्यांनी वाढली. 

लॉकडाऊनमध्ये मराठी विकिपीडिया जोमात; वाचकसंख्या दुपटीनं वाढली, 'या' लेखाला मिळाले सर्वाधिक वाचक..

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मुबलक वेळ असल्याने लोकांनी ऑनलाईन वाचन आणि लेखन करण्यास प्राधान्य दिले. दरवर्षी मार्च ते जून या उन्हाळी सुटहीच्या काळात मराठी विकिपीडियाची वाचकसंख्या वर्षातील किमान पातळीवर असते. या वर्षी लॉकडाऊनमुळे मराठी विकिपीडिया वाचकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 38 टक्क्यांनी वाढली. 

एप्रिलमध्ये पावणेतीन लाख असलेली वाचकसंख्या मे महिन्यात दुप्पट झाली. मराठी विकिपीडियावरील लेखनाचे प्रमाणही वाढले. या काळात 'कोरोना व्हायरस' लेखाला सर्वाधिक म्हणजे 74 हजार 18 वाचक मिळाले. मराठी विकिपीडियाची वाचकसंख्या मे 2019 मध्ये एक लाख 79 हजार 719 होती; ती मे 2020 मध्ये दुप्पट होऊन दोन लाख 46 हजार 882 झाली. 

हेही वाचा: मुंबईकरांनो संकटाच्या काळात तुमच्यासाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण....

या काळात मराठी विकिपीडियावरील लेखकांचे योगदान वाढले आहे. जानेवारी ते मेपर्यंत विकीपीडियावरील लेखांमध्ये 1293 नव्या लेखांची भर पडली. मराठी विकिपीडियावर 57 हजार 176 लेख असून, दोन लाख 33 हजार 571 पाने आहेत, अशी माहिती प्रचालक व विकीमीडिया इंडियाचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिली. 

कोव्हिड -19 महामारीमुळे देशात टाळेबंदी आहे. प्रभावी औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शैक्षणिक क्षेत्रासमोरील समस्या आणि उपाययोजना  या विषयावर नुकतीच एक दिवसाची वेब परिषद झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, विकिमीडिया इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲंड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअर्स यांनी ही परिषद आयोजित केली होती.  सरकारी प्रतिनिधी, उद्योजक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी विषयांतील अमेरिका, इटली, जपान आणि भारतातील 22 तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

 मोठी बातमी - 120 कोरोना रुग्णांना दिलं 'हे' औषध त्यातले 108 झालेत बरे; जाणून घ्या कोणतं आहे 'हे' औषध


डिजिटल व्यासपीठाचा वापर करा:

कोव्हिड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ज्ञानार्जन, परीक्षा, प्रात्यक्षिके यासाठी तांत्रिक उपाययोजना केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनासाठी विकिपीडिया आणि मराठी विश्वकोशाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि मोबाईल ॲपद्वारे मराठी विश्वकोश उपलब्ध करून देण्यात आला आहे. विश्वकोशाची व्याप्ती बहुआयामी असल्याने अनेक विषयांची माहिती मातृभाषेतून डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध झाली आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

readers of marathi wikipedia have been increased in lockdown