बाप रे... घरांच्या किमती एवढ्या घसरणार 

बाप रे... घरांच्या किमती एवढ्या घसरणार 

मुंबई : कोरोनामुळे जगाचे अर्थकारण बदलले आहे. त्याचाच परिणाम निवासी मालमत्तांच्या दरावर होणार आहे. मुंबईत तर एक वर्षात जागांचे दर आठ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण्याची शक्‍यता आहे. या क्षेत्रातील संशोधन आणि सल्लागार संस्था नाईट फ्रॅंकच्या जागतिक निवासी मालमत्ता अहवालात ही शक्‍यता नमूद करण्यात आली आहे. 

मुंबईत 2019-20 या वर्षात दर किंचित घसरले होते. यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात 2019 पेक्षा 0.1 टक्‍क्‍यांनी निवासी घरांचे दर घसरले. आता उरलेल्या वर्षात या शहरातील प्रमुख ठिकाणच्या घरांचे दर पाच टक्‍क्‍यांपर्यंत घसरतील अशी शक्‍यता आहे. इतकेच नव्हे तर त्यापुढील वर्षातही घसरण सुरुच राहील. आणखी तीन टक्‍क्‍यांनी दर कोसळतील, अशी शक्‍यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. 

दिल्लीत निवासी घरांच्या किमती साधारण आहे त्याच राहतील. पण बंगळुरूमध्ये दरात किंचित (0.1 टक्के) वाढ अपेक्षित आहे. भारतात यावर्षीच्या सुरुवातीला अनेक शहरांमध्ये मोठ्या संख्येत घरे विक्रीअभावी पडून राहिली होती. त्यातच आता कोरोनामुळे सर्वांचेच अर्थकारण बिघडल्याने निवासी जागांचे दरही कमी होत आहेत. मात्र यावर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये मालमत्ता दरांवर नेमका किती वाईट परिणाम झाला तो अजून पूर्णपणे समोर आला नाही, असेही अहवालात म्हटले आहे. 

"नाईट फ्रॅंक' ने कोरोना येण्यापूर्वीच्या अहवालात यावर्षी जगातील प्रमुख 20 शहरांमधील निवासी मालमत्तांचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र कोरोनानंतर त्यापैकी 16 शहरांमधील जागांचे दर घसरले असून केवळ लिस्बन, मोनॅको, व्हिएन्ना व शांघाई येथील जागांचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. यापैकी काही शहरांमध्ये आधीपासूनच जागांची टंचाई आहे तर काही ठिकाणी लॉकडाऊनच्या काळातही मालमत्तांचे सौदे झाल्याने दर घसरले नाहीत. 

धनिकांना संधी 
हॉंगकॉंग, सिंगापूर, शांघाय, व्हॅंकूव्हर, लंडन, बर्लिन, पॅरीस, न्यूयॉर्क, लॉसएंजिलस, मेलबोर्न, सिडनी आदी जगातल्या प्रमुख 20 शहरांमधील निवासी मालमत्तांच्या दरांचा अभ्यास करून "नाईट फ्रॅंक'ने हा अहवाल तयार केला आहे. सध्या खरेदीदारांमध्ये विश्वास नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. तरीही महत्त्वाचे म्हणजे आलिशान जागांच्या किमती आकर्षक पातळीला आल्याने ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अर्थात जागतिक अनिश्‍चितता नेमकी किती आहे व परिस्थिती अजून काय वळण घेईल, हे अजून समोर येत नसल्याने नेमका अंदाज वर्तविणे कठीण असल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com