esakal | 'म्हाडा' व 'एचडीएफसी लिमिटेड' यांच्यात झाला 'हा' करार
sakal

बोलून बातमी शोधा

Mhada

'म्हाडा' व 'एचडीएफसी लिमिटेड' यांच्यात झाला 'हा' करार

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत मुंबईसह विविध विभागीय मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या सोडतीतील सदनिका (Apartment) विजेत्यांना गृहकर्ज (Home loan) सुलभरित्या मिळवून देण्याकरिता म्हाडा व हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) लिमिटेड यांमध्ये बुधवारी (ता.14) सामंजस्य करार (Agreement) करण्यात आला. सोडत विजेत्या अर्जदारांना एचडीएफसी बँकेकडूनच गृहकर्ज घेणे बंधनकारक नसून गृहकर्जासाठी केवळ सुलभ पर्याय (Best Facility) म्हाडाने उपलब्ध करून दिला आहे. (Reconciliation Agreement Between MHADA And HDFC home loan not necessary)

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात म्हाडातर्फे वित्त नियंत्रक विकास देसाई व एचडीएफसी लिमिटेडतर्फे सहमुख्य महाव्यस्थापक अजय सचदेव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून व म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सोडतीतील विजेत्या अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडाद्वारे परवडणारी घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जातात. त्याचप्रमाणे सोडतीतील विजेत्या अर्जदारांना घर खरेदीसाठी परवडणाऱ्या व्याजदरात, सुलभ रितीने गृहकर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांना संबंधित वित्त संस्थेकडून गृहकर्ज घेणे बंधनकारक नसून गृहकर्जासाठी केवळ सुलभ पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबईत उद्यापासून गर्भवती महिलांचे लसीकरण, ३५ केंद्रांची माहिती जाणून घ्या

याप्रसंगी देसाई म्हणाले की, म्हाडा सोडतीतील सदनिका विजेत्यांना गृहकर्ज सुलभरीत्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. म्हाडाच्या सदनिका विजेत्यांकडून गृहकर्जासाठी अर्ज करतेवेळी एचडीएफसी लिमिटेडतर्फे कोणतेही डॉक्युमेंटेशन शुल्क आकारले जाणार नाही. तसेच गृहकर्ज प्रक्रियेकरिता म्हाडाच्या सोडत विजेत्यांकडून 2 हजार 500 रुपये शुल्क आकारले  जाणार आहे. तसेच ग्राहक सेवा लक्षात ठेवता म्हाडातर्फे दर तीन महिन्यांनी एचडीएफसी लिमिटेडतर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

loading image