नवीन जागेची थकीत वीजबिल वसुली विद्यमान मालकाकडूनच; ग्राहक न्यायालयाचा याचिकेवर निर्णय

सुनिता महामुणकर
Monday, 26 October 2020

तुम्ही जर नवीन जागा घेत असाल तर आधी त्या जागेचे विजेचे बिल पूर्ण भरले आहे की नाही ते तपासून घ्या; अन्यथा जागेचे नवीन विद्यमान मालक म्हणून थकीत बिल तुमच्याकडून वसूल केले जाईल.

मुंबई : तुम्ही जर नवीन जागा घेत असाल तर आधी त्या जागेचे विजेचे बिल पूर्ण भरले आहे की नाही ते तपासून घ्या; अन्यथा जागेचे नवीन विद्यमान मालक म्हणून थकीत बिल तुमच्याकडून वसूल केले जाईल. राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकतीच याबाबत नव्या जागा मालकाने केलेली याचिका नामंजूर केली आहे.

वीजपुरवठा खंडित प्रकरण! ऊर्जामंत्र्यांकडून ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राची पाहणी

नवीन जागा खरेदी करताना जागेचे वीजमीटर नव्या मालकाने स्वतःच्या नावावर वर्ग करणे आवश्‍यक आहे. यासाठी योग्य ती कार्यवाही आणि चौकशी नव्या मालकाने करायला हवी; अन्यथा जुने थकीत वीजबिल मालक म्हणून त्यांच्याकडून वसूल केले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
ठाण्यात राहणाऱ्या आणि व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या ग्राहकाने दवाखान्यासाठी जागा विकत घेतली होती. या जागेचे विजेचे बिलही ते नियमित भरत होते; मात्र अचानक ऑगस्ट 1998 मध्ये त्यांच्या दवाखान्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याची चौकशी केली असता सुमारे 32 हजार रुपयांची थकबाकी असून ती भरण्याचे वीज मंडळाकडून सांगण्यात आले. ही रक्कम जुन्या मालकाची थकीत आहे, असा खुलासा तक्रारदाराने केला; मात्र मंडळाने हा खुलासा अमान्य केला.

फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात 

मालक म्हणून तुम्ही बिलाची रक्कम भरायला हवी, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी दहा हजार रुपये भरले आणि उर्वरित रक्कम हप्त्यात देण्याचे मान्य केले. रक्कम भरल्यानंतर त्यांनी मंडळाविरोधात सुमारे 1,25000 हजार रुपयांचा भरपाईचा दावा दाखल केला; मात्र जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा दावा अमान्य केला. 

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery of overdue electricity bill of new premises from existing owner only Consumer Court decision on petition