अमेरिकेच्या टेस्ला कंपनीसाठी लाल गालिचा; उद्योगमंत्री, पर्यावरणमंत्र्यांची वेबिनारद्वारे चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेच्या आघाडीच्या टेस्ला कंपनीने राज्यात प्रकल्प सुरू करावा, यासाठी मविआ सरकारने प्रयत्न सुरू केले असून, याच अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली.

मुंबई : पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेच्या आघाडीच्या टेस्ला कंपनीने राज्यात प्रकल्प सुरू करावा, यासाठी मविआ सरकारने प्रयत्न सुरू केले असून, याच अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली.

अधिक वाचा : डोंबिवलीकरांच्या उखडलेल्या पेव्हरब्लॉकवरून उड्या; स्थानक रस्त्याची दैना

राज्य सरकारने 2019 मध्ये नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले असून, यामध्ये इलेक्‍ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्‍ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी राज्यात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्लाने राज्यात आपला प्रकल्प सुरू करावा, असे राज्य सरकारच्या वतीने उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले. टेस्लाला प्रकल्प सुरू करण्यासाठी विशेष सुविधांसह प्रोत्साहनपर सवलती दिल्या जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. टेस्लाने वाहन निर्मिती प्रकल्प व संशोधन आणि विकास (आरअँडडी) केंद्र राज्यात सुरू करावे, त्यांना आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा राज्य सरकार पुरवेल, अशी ग्वाहीही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. टेस्ला कंपनीच्या वतीने जागतिक संचालक रोहन पटेल, डॉ. सचिन सेठ हे चर्चेत सहभागी झाले होते. टेस्लासाठी महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे हेही उपस्थित होते. 

अधिक वाचा : मुंबईतील 4 प्रभागांमध्येच कोव्हिडचे 25 टक्के मृत्यू; सर्वात कमी मृत्यू हे फोर्ट कुलाबा परिसरात

प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण पूरक वाहन निर्मितीला चालना देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सरकारने काही धोरणे निश्‍चित केली आहे. येत्या काळात इलेक्‍ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. विशेषतः मुंबईत इलेक्‍ट्रिक वाहनांचा अधिक वापर झाल्यास ते पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. 
- आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री. 

---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red carpet for Tesla Company of America; Minister of Industry, Minister of Environment discussed through webinar