esakal | ९० लाखांच्या रस्त्याला लाल माती
sakal

बोलून बातमी शोधा

म्‍हसळा : रस्‍त्‍यांवर पडलेले खड्डे

म्हसळ्यातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९० लाख रुपयांचा निधी दिघी पोर्टच्या माध्यमाने पास्को कंपनीकडून मिळाला होता. रस्त्याचे मे महिन्यात नूतनीकरणही झाले. परंतु, निकृष्ट दर्जाचे काम व बांधकाम विभागाचे नियंत्रण नसल्याने रस्त्यावरील खड्डे दगड-मातीने भरले जात आहेत.

९० लाखांच्या रस्त्याला लाल माती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

म्हसळा (वार्ताहर) : म्हसळ्यातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणाऱ्या दीड ते दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९० लाख रुपयांचा निधी दिघी पोर्टच्या माध्यमाने पास्को कंपनीकडून मिळाला होता. रस्त्याचे मे महिन्यात नूतनीकरणही झाले. परंतु, निकृष्ट दर्जाचे काम व बांधकाम विभागाचे नियंत्रण नसल्याने रस्त्यावरील खड्डे दगड-मातीने भरले जात आहेत. रस्त्याला दगड- लाल मातीने बुट्टे लावले जात असल्याची उपरोधिक टीका आणि त्यामुळेच भ्रष्टाचार कोणाचा, सरकारचा की ठेकेदाराचा? अशी चर्चा सुरू झाली आहे.

म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल ते सलाम हळदे यांच्या घरापर्यंतचा बहुतांश रस्ता हा खड्डेमय झाला आहे. दीड ते दोन किलोमीटर अंतराचा हा रस्ता दुरुस्त करून मिळावा, यासाठी म्हसळा तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पत्रकारांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. निवेदन देऊन पोर्टमार्फत नूतनीकरण करून मिळावा म्हणून मागणीही केली होती. अखेर पोर्ट प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन पास्को कंपनीमार्फत ९० लाख रुपये खर्च करून मेअखेर रस्त्याचे नूतनीकरण केले. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाल्याने त्‍यातील नियम व निकषात सरकार व ठेकेदाराने हलगर्जी, निष्काळजीपणाने काम केल्याचा जाणकारांचा दावा आहे. या रस्त्याची सध्‍या चाळण झाली असून लालामातीचे बुट्टे लावले जात आहेत. 

तालुक्‍यातील म्हसळा-पाभरे वाशी, आंबेत-बागमांडला, देहेन-पांगळोली, खामगाव-म्हसळा-श्रीवर्धन, कुडगाव-हरवीत-तुरुंबाडी, म्हसळा-तळवडे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग महाड, उपशाखा विभाग श्रीवर्धनकडे,  तर उर्वरित रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे गणेशोत्‍सवात प्रवास खडतर होत असल्याने चाकरमान्यांत नाराजी आहे.

ग्रामीण व शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे. त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. सरकारने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत.
- महादेव पाटील, तालुकाप्रमुख, शिवसेना

खड्डे बुजविण्याची टेंडर प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. तूर्त डिपार्टमेंटल पद्धतीने, प्राधान्यक्रमाने खड्डे बुजविणे सुरू आहे. 
- श्रीकांत गणगणे, उपअभियंता,  सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

loading image
go to top