मुंबई पालिकेची मोठी कारवाई, माहिममधल्या 'या' रुग्णालयाची नोंदणी रद्द

पूजा विचारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

माहिममधील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी जी उत्तर पालिकेकडून रद्द करण्यात आली आहे.

मुंबईः सध्या राज्यात कोरोनाचं सावट आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रशासनानं प्रयत्न करताना दिसताहेत. राज्य सरकारनं कोरोनाच्या उपचारासाठी पालिकेसह खासगी रुग्णालयासाठी खास कार्यप्रणाली आखली आहे. चाचणी, रुग्णालयातील उपचार याची रक्कम राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आली असतानाही आतापर्यंत खासगी रुग्णालयाकडून अव्वाच्या सव्वा बिलं आकारल्या घटना समोर आल्या आहेत. आता अशातच नोटीस बजावूनही न ऐकणाऱ्या रुग्णालयांवर पालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

ठाणे, मिरा भाईंदर पालिकेनंतर मुंबई पालिकेनं रुग्णांकडून अवास्तव बील वसूल करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केलीय. माहिममधील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी जी उत्तर पालिकेकडून रद्द करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून घेण्यात आलेले अधिक पैसे आणि एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणानंतर पालिकेनं ही कारवाई केली आहे.  त्यासोबत जी उत्तर पालिकेच्या कार्यालयात आतपर्यंत अनेक कोरोनामुक्त रुग्णांनी या रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली होती. 

माहीममधील क्रॉस रोड क्रमांक 2, एम. एम. चोटानी मार्गावरील ‘फॅमिली केअर’ रुग्णालयामध्ये आतापर्यंत सुमारे एक ते दीड हजार कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आलेत. त्यात पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 

हेही वाचाः भयंकर! भिवंडीत ऑन ड्युटी असलेल्या पोलिसावर चाकूनं वार

या कारवाईनंतर रुग्णालयात दाखल रुग्णांची 48 तासात अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवावे. तसेच नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये असे आदेशही पालिकेने दिलेत. 

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा करोना अहवाल नकारात्मक आला होता. तरीही त्याच्यावर कोरोनाविषयक उपचार करण्यात येत होते. तसेच त्याला आवश्यक असलेले औषध आणण्यासाठी भलत्याच रुग्णाच्या नावाची चिठ्ठी देण्यात आली होती, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. तसंच या रुग्णालयाने आपल्याकडून उपचारासाठी सरकारी दराऐवजी अधिक पैसे घेतल्याची तक्रार कोरोनामुक्त झालेल्या काही व्यक्तींनी पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे केली होती. प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर पालिकेनं हा रुग्णालयाची मान्यता एक महिन्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचाः  मुंबईत पुन्हा धोका वाढतोय? सलग दोन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक

रुग्णाचा  मृत्यू आणि यापूर्वीच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर न दिल्यामुळे बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १९४९ अंतर्गत रुग्णालयाची  नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.

Registration private hospital Mahim canceled one month action BMC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration private hospital Mahim canceled one month action BMC