
रेमडेसिवीर तयार पण सरकारी परवानगीमुळे रखडला पुरवठा
मुंबई: गेल्या काही दिवसात देशात आणि विशेषत: राज्यात रेमडेसिवीर हा शब्द साऱ्यांनाच परिचयाचा झालेला आहे. कोरोनावर प्रभावी ठरणारं रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या राज्यात तुटवडा आहे. रेमडेसिवीरचे उत्पादन करण्यास आणि ते औषध तयार होण्यास ठराविक कालावधी द्यावा लागतो. त्यामुळे औषधाची मागणी जरी मोठ्या प्रमाणावर असली तरी त्याचा पुरवठा फारच कमी आहे. इतर राज्यांकडून महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा साठा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना औषध निर्यातदारांकडे मात्र रेमडेसिवीर पडून असल्याची बाब समोर आली आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे निर्यातदारांना स्थानिक बाजारात रेमडेसिवीरचा पुरावठा करता येत नसून ही परवानगी देण्याची मागणी या निर्यातदारांनी सरकारकडे केली आहे.
देशभरात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे निर्यातदारांना रेमडेसिवीर निर्यात करता येत नाहीये. या निर्यातदारांकडे रेमडेसिवीरच्या लाखो कुप्या सध्या पडून असल्याचे निर्यातदार रवी चौधरी यांनी सांगितले आहे. पण स्थानिक बाजारात व्यवसाय करण्याला परवानगी नसल्याने ते रेमडेसिवीर त्यांच्याकडे असूनदेखील त्याची विक्री करणे त्यांना शक्य होत नसल्याचं दिसतंय. अशा परिस्थितीत या रेमडेसिवीरबद्दलचा निर्णय घ्यावा आणि त्याचा पुरवठा करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
कोरोना संसर्ग वेगाने पसरल्याने गंभीर रुग्णांची संख्या ही वाढली आहे. पर्यायाने त्यांच्यावरील उपचारासाठी रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. मात्र सध्या रेमडेसिवीर उपलब्ध नसल्याने तुटवडा जाणवत आहे. मात्र निर्यातदारांना सरकारने परवानगी दिल्यास राज्यात दिवसाला निदान 50 हजार कुप्या उपलब्ध होतील.
- रवी चौधरी, निर्यातदार
राज्यातील निर्यातदारांनी गुरूवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली. यानंतर टोपे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे निर्यातदारांनी स्पष्ट केले. राज्य सरकारला यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी लागणार असून ही परवानगी मिळाल्यास हा पेच सुटेल आणि रेमडेसिवीर उपलब्ध होण्याची शक्यता वाढेल अशी चिन्ह आहेत. रेमडेसिवीरची निर्मिती देशातील केवळ 7 कंपन्या करतात. देशभरातील अनेक निर्यातदार या कंपन्यांकडून इंजेक्शन घेऊन परदेशात निर्यात करतात. पण सध्या केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने रेमडेसिवीरच्या लाखो कुप्या पडून आहेत.
(संपादन- विराज भागवत)