esakal | बापरे! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला २ लाखाचा आकडा
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus Update

बापरे! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला २ लाखाचा आकडा

sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

Coronavirus Updates: नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत चालली आहे. गुरुवारी (ता.१५) दिवसभरात नोंदवली गेलेली आकडेवारी मनात धडकी भरवणारी ठरली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी २ लाखाचा आकडा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. दररोज सरासरी १० ते १५ हजार रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारी दिवसभरात सापडलेल्या रुग्णांसह कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ४२ लाख ९१ हजार ९१७ झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात ११८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७४ हजार ३०८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा: पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी

सध्या देशभरात १५ लाख ६९ हजार ७४३ लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. तसेच आतापर्यंत १ कोटी २५ लाख ४७ हजार ८६६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६ कोटी ३४ लाख ७६ हजार ६२५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गुरुवारी दिवसभरात १४ लाख ७३ हजार २१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ही आकडेवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा: लसीची एक मात्रा पुरेशी

सध्या केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे लसीकरण मोहीम वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. रशियाच्या लसीचाही आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लसीकरणाला आणखी बळ मिळाले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे लसीची मागणी वाढली आहे. परिणामी त्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. जगभरात लसीची आणीबाणी निर्माण होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

हेही वाचा: खरं सांगतोय! सुपरमार्केटमधून 'अ‍ॅपल'ची ऑर्डर दिली अन् मिळाला आयफोन

दरम्यान, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) तपासलेल्या ३६१ नमुन्यांपैकी तब्बल २२० म्हणजेच ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याची बाब पुढे आली आहे. हे नमुने जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यातील विविध भागांतून घेण्यात आले होते. ‘एनआयव्ही’कडील आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात ठाणे आणि अकोला जिल्ह्यांत कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन (बी.१.६१७) आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, नागपूर, पुणे, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा स्ट्रेन आढळला. या जिल्ह्यांतून प्रत्येकी १० ते ३० नमुने घेण्यात आले होते.