रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत होणार कमी, जाणून घ्या नवी किंमत

भाग्यश्री भुवड
Sunday, 7 March 2021

कोविड 19  च्या उपचारासाठी प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन 100 मि. ग्रँ हे औषध प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले आहे.

मुंबई: राज्यात कोविड 19 च्या संसर्गाचे वाढत असलेले प्रमाण आणि त्याबरोबर वाढती रुग्णसंख्या  बघता उपचारासाठी लागणारी औषधे प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजन, आणि इतर औषधांच्या राज्यातील उपलब्धतेबाबत नियमित आढावा अन्न व औषध प्रशासन घेत आहे. 

कोविड 19  च्या उपचारासाठी प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन 100 मि. ग्रँ हे औषध प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले आहे. सध्या बाजारात 06 प्रमुख उत्पादकाचे रेमडेसिवीर इंजेक्शन 100 mg उपलब्ध आहेत.  

सध्या बाजारात  उपलब्ध  असलेल्या 06  उत्पादकाच्या  रेमडेसिवीर इंजेक्शन 100 मि. ग्रँ  ची  अधिकतम किरकोळ विक्री किमतीबाबत प्रशासनाने माहिती घेतली असता सिप्ला ली. 4 हजार रुपये, झायडस हेल्थकेअर  2800 रु., हेटेरो हेल्थकेअर रू 5400, डॉ. रेड्डीज लँब रू 5400 , मायलन ली. रू 4800 आणि जुबिलंट  जेनेरिक ली. रू 4700 असल्याचे आढळून येते. हे औषध घाऊक विक्रेत्यांना आणि रूग्णालयास 800 ते 1200 रु. किंमतीत पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे आहे. याप्रकरणी वाढीव अधिकतम किरकोळ विक्री किमतीचा रुग्णावर आर्थिक भुर्दंड पडत असल्याबाबत  विविध स्तरातून रोष व्यक्त होत असल्याने डॉ. राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषध प्रशासन आणि सौरभ विजय, मा. सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग  यांनी या प्रकरणी कार्यवाही घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या  औषधाची  घाऊक आणि किरकोळ विक्री किंमतीतील तफावत बघता व्यापक जनहिताच्या  दृष्टीने  केंद्र शासनाने  औषध किंमत नियंत्रण आदेश 2013  अंतर्गत अधिकाराचा वापर करून  रेमडेसिवीर इंजेक्शन 100 एमजीची  अधिकतम किरकोळ विक्री किंमत निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांनी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण, नवी दिल्ली यांना सादर केला आहे. 

तसेच  रेमडेसिवीर इंजेक्शनच्या घाऊक विक्री किंमत आणि अधिकतम किरकोळ विक्री किंमत यातील हा मोठा फरक कसा कमी करता येईल आणि  रुग्णांना  माफक दरात हे औषध कसे उपलब्ध होईल या अनुषंगे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन  यांनी वरिष्ठअधिकाऱ्यांसह 06 मार्चला मुंबई मुख्यालयात बैठक आयोजित केली  होती.

हेही वाचा- मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रार्दुभाव? दिवसागणिक वाढतेय कोरोना रुग्णांचा संख्या

या बैठकीस सिप्ला ली., झायडस हेल्थकेअर , हेटेरो हेल्थकेअर , डॉ. रेड्डीज लँब , मायलन ली. या उत्पादकांचे  प्रतिनिधी तसेच रिटेल केमिस्ट आणि ड्रगिस्ट आणि घाऊक औषध  विक्रेते संघटनेचे  प्रतिनिधी उपस्थित होते. आयुक्त, अन्न व औषध  प्रशासन यांनी सदर उत्पादकांनी रेमडेसिवीर इंजेक्शन या कोविड 19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या प्रमुख औषधाची घाऊक विक्री किमतीच्या प्रमाणात अधिकतम किरकोळ विक्री किंमत रुग्णहिताच्या दृष्टीने  कमी करण्याचा निर्णय घेण्याची सूचना  केली. तसेच बाजारात किरकोळ औषधे विक्रेत्यांकडे यां औषधाचा  पुरेसा साठा वितरीत करावा असे निर्देश दिले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Remedesivir injection will cost less check out the new price here


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remedesivir injection will cost less check out the new price here