निधीअभावी रायगड जिल्ह्यातील शाळांच्या दुरूस्तीची कामे रखडली; नादुरूस्त वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवायचे कसे?

महेंद्र दुसार
Sunday, 20 September 2020

  • उर्वरित निधीच्या प्रतीक्षेत रायगडच्या शाळा
  • अंगणवाड्यांसह 3 हजारांहून अधिक शाळा नादुरुस्त; 24 कोटी निधीपैकी साडेसात कोटी सुपूर्द

अलिबाग : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा केव्हातरी सुरू कराव्या लागणार आहेत; परंतु रायगडमधील शाळा सुरू होण्याआधी त्यांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 24 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. उर्वरित निधी वेळेत आला, तरच जिल्ह्यातील शाळा सुरू होतील; अन्यथा मोडक्या वर्गखोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना बसावे लागणार आहे.

जेएनपीटी बंदरात अडकला हजारो मॅट्रिक टन कांदा; निर्यातदारांना दररोज हजारोंचा फटका

निसर्गाचा फटका हा रायगडकरांना मोठ्या प्रमाणात बसला होता. यात जिल्हा परिषदेच्या 1552 शाळा, 1350 अंगणवाडी, खासगी 186 शाळांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पडझड झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे? हा एक प्रश्न उपस्थित झाला होता.
याबाबतचा दुरुस्ती प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. एनडीआरएफच्या निकषानुसार केवळ 24 कोटी निधी शाळांसाठी मंजूर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात 7 कोटी 59 लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू केली आहे. उर्वरित निधी मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. वेळेत निधी मिळाला, तरच शाळांची दुरुस्ती होऊ शकते. 

नानावटी हॉस्पिटलच्या कर्करोग उपचार क्षमतेत वाढ; विशिष्ट अवयवांवरील उपचारासाठी ‘सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट’चे पथक

जितका उशीर निधी, तितकी उशीरा शाळा
पहिल्या टप्प्यातील निधी मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला तीन महिने लागले आहेत. त्यामुळे जितका उशीर होईल तितका रायगडमधील शाळा सुरू होण्यास विलंब लागणार आहे. 

निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान
                              एकूण इमारती    नुकसान
जिल्हा परिषद शाळा   1552             37 कोटी
अंगणवाडी                 1350             13 कोटी
खासगी शाळा              186                6 कोटी

 

 

निसर्गग्रस्त जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठीच्या निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. 24 कोटींचा निधी शाळेसाठी मंजूर झाला असून, त्यापैकी 7 कोटी 59 लाख रुपये काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदकडे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. 
- अदिती तटकरे,
पालकमंत्री, रायगड

 

निधी कमी आणि शाळांची संख्या जास्त असल्याने ज्या शाळांचे जास्त नुकसान झालेले आहे, अशांना प्राधान्यक्रमाने निधी दिला जाणार आहे. उर्वरित निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरच वेळेत शाळा सुरू होऊ शकतील.
- शीतल फुंड,
माध्यमिक शिक्षणाधिकारी (प्रभारी), 
रायगड जिल्हा परिषद

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair work of schools in Raigad district stalled due to lack of funds