Republic day 2021 | आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे येथे शासकीय ध्वजारोहण संपन्न

तुषार सोनवणे
Tuesday, 26 January 2021

प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे येथे शासकीय ध्वजारोहण करण्यात आले

मुंबई  : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे येथे शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह विधानसभा सदस्य झीशान बाबा सिद्दीकी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह सर्वांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन केले.

ध्वजवंदनानंतर ठाकरे यांच्याहस्ते कोरोना महामारीच्या काळात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.उर्मिला पाटील, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी गायकवाड, डॉ.सुनिल चव्हाण, आरोग्य सेविका श्रीमती सरला सानप, आरोग्य स्वयंसेविका श्रीमती मानसी मिसाळ, श्रीमती सविता शिंदे, श्रीमती कविता कटके, श्रीमती रूपाली भरमळ, श्रीमती सिमा खंडारे, समाज विकास अधिकारी बाबा पाटील, दुय्यम अभियंता मयुर बोरसे यांचा समावेश आहे.

त्यानंतर मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या कु.प्रणाली धुरी हिला प्रमाणपत्र आणि १० हजार रूपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या स्पर्धेत द्वितीय आलेल्या कुमारी प्रतिक्षा गुरव हिला प्रमाणपत्र व ५ हजारांचा धनादेश आणि तृतीय क्रमांक आलेल्या कु.कोमल रोटे हिला प्रमाणपत्र व २.५ हजारांचा धनादेश देऊन श्री.ठाकरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत अपुर्वा श्रीहर्ष रोकडे हिला कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबाबत पालकमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि १० हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच आदित्य पाटील (मल्लखांब), श्रीमती मेघाली रेडकर (डायव्हिंग जलतरण), मार्क जोसेफ (पॅरा बॅडमिंटन), सुनील गंगावणे (मल्लखांब) आणि निलेश गराटे (पॉवर लिप्टींग) यांना गुणवंत खेळाडूंचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व रोख १० हजार रूपये देऊन सन्मानित करण्यात आले. पूर्व उच्च माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील कु.असीम वत्सराज, कु.किमया जोशी आणि श्रीशांत वैद्य यांचाही मंत्रीमहोदयांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

ठाकरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच उपस्थितांची भेट घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका श्रीमती दीपिका गावडे यांनी केले.

-------------------------------------------------

Republic day 2021 Government flag hoisting at Bandra by Aditya Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic day 2021 Government flag hoisting at Bandra by Aditya Thackeray