ऑफलाईनला प्रतिसाद, पण ऑनलाईन कोर्टही हवे; बॉम्बे बार असोसिएशन आणि अन्य संघटनांचे निवदेन

सुनिता महामुणकर
Saturday, 19 December 2020

प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यावर गर्दी वाढण्याची शक्यता वकिलांच्या बॉम्बे बार असोसिएशन आणि अन्य संघटनांनी मुख्य न्यायमुर्तींकडे निवेदन देऊन व्यक्त केली आहे.

 

मुंबई : तब्बल आठ महिन्याच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष सुनावणीला वकिल पक्षकारांचा प्रतिसाद मिळत असला तरी न्यायालयातील गर्दी वाढत असल्यामुळे ऑनलाईनचा पर्याय येणाऱ्या वर्षातही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईसह देशभरातील कामकाज ठप्प पडले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ऑनलाईन सुनावणीचा पर्याय उपलब्ध करून न्यायालये लॉकडाऊन होऊ दिली नाही. त्यामुळे आठ महिन्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरु झालेले व्हरच्युअल कोर्ट न्याय मंदिर खुली राहण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर ही सुविधा उपलब्ध करताना आता प्रत्यक्ष सुनावणीमध्येही न्याय प्रशासनाने हा पर्याय कायम ठेवला आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष सुनावणीचे काम सुरू झाले आहे. प्रत्यक्ष सुनावणीमुळे न्यायालयात सुरक्षा नियमांची काटेकोर आखणी केली असून त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त असून ओळखपत्र दाखवल्याशिवाय पोलिसांकडून प्रवेश दिला जात नाही. तसेच तेथे असलेले पोलीस कर्मचारी प्रत्येकाचे तापमान ऑक्सिमीटरवर तपासून मगच आत प्रवेश दिला जातो. न्यायालयात काचेची तावदाने लावण्यात आली असून न्यायाधीश, कर्मचारी आणि वकील अशा प्रत्येकाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. न्यायालयातील व्यक्ती संख्या आणि बसण्याच्या व्यवस्थेवरही निर्बंध आहेत. तसेच न्यायालये सॉनिटाईझ करण्याचे कामही नियमित केले जाते. सर्वांना मास्क घालून वावरणे सक्तीचे करण्यात आले आहे. एकूणच कोरोनाच्या पाश्वभूमीवर सुरक्षेची अमंलबजावणी करण्यात येत आहे.

मुख्य न्यायमुर्तींचे न्यायालय प्रशस्त सेंंट्रल हॉल न्यायालयात असून अन्य न्यायालये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहेत.  मात्र वकील आणि पक्षकारांची उपस्थिती अंदाजापेक्षा तुलनेत अधिक दिसत आहे

 न्यायालयात उपस्थित राहणाऱ्या वकिलांची संख्या वाढत असल्यामुळे आणि त्या तुलनेत काही न्यायालये लहान असल्याने गर्दीचा प्रश्न निर्माण होत आहे. औफलाईनला सुमारे पन्नास याचिकांवर सुनावणी घेण्याचे निश्चित केले असले तरी यापेक्षा अधिक याचिकाही बोर्डवर असतात. त्यामुळे देखील वकिलांची उपस्थिती वाढत आहे.

नदी शुध्दीकरण प्रकल्पासाठी कंत्राटदारांना BMC ची शेवटची संधी; 29 डिसेंबर नंतर मुदतवाढ बंद

न्यायालय आवाराबाहेर कॅटीनमध्ये बसण्याच्या सुविधा उपलब्ध नाही. मात्र तरीही अनेक कारणांमुळे लोक इथे उभी असतात. न्यायालयातील वाढत्या गर्दीबाबत काही खंडपिठांनी चिंताही व्यक्त केली आहे आणि ऑनलाईन सुनावणीची गरज व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यावर गर्दी वाढण्याची शक्यता वकिलांच्या बॉम्बे बार असोसिएशन आणि अन्य संघटनांनी मुख्य न्यायमुर्तींकडे निवेदन देऊन व्यक्त केली आहे. न्यायालय प्रशासनाने याची दखल घेऊन ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध केला आहे.  हा पर्याय येत्या नवीन वर्षात अधिक दिवस सुरु ठेवण्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

Response to offline good but also to court online Elections of the Bombay Bar Association and other associations

-------------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to offline good but also to court online Elections of the Bombay Bar Association and other associations