ड्रग्स पेडलर्स रायगड पोलिसांच्या रडारवर, धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

ड्रग्स पेडलर्स रायगड पोलिसांच्या रडारवर, धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

मुंबई:  कोरोनानंतरचे नवे पर्व आणि नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेकजण तयारी करत असतात. या संधीचा आर्थिक फायदा घेण्यासाठी मुंबईतील काही ड्रग्स पेडलर्स रायगड जिल्ह्यात आपले हातपाय पसरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.  रायगड पोलिसांनी यासाठी तीन स्तरावर कोंम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. खालापूर तालुक्यात एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत पोलिसांना या ड्रग्स पेडलर्सचे धागेदोरे मिळाले असल्याचा दावा रायगड पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी केला आहे.

शनिवारी दिव-दमण येथून मद्याच्या साठ्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पनवेल आणि अलिबागमध्ये एकूण चार जणांना अटक केल्यानंतर अंमली पदार्थ आणि मद्याचा साठा करणाऱ्यांवर रायगड पोलिसांची बारिक नजर असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील अनेक सिनेस्टार, व्यावसायिकांचे फार्म हाऊसेस, बंगले रायगड जिल्ह्यात आहेत. या धनाढ्य लोकांकडून अंमली पदार्थांना मागणी जास्त असते. मुंबईतील सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थांविरोधात नार्कोटिक्स विभागाने अनेक कलाकारांसह त्यांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे मुंबईतील धास्तावलेले ड्रग्स पेडलर्स रायगड जिल्ह्यात आपला बस्तान मांडू शकतात, अशा संशय रायगड पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने खालापूर येथे केलेल्या जुगार अड्ड्यावरील कारवाईला महत्व आले आहे.

रायगड पोलिसांनी अंमली पदार्थांची शोध मोहिम अधिक व्यापक करण्यात आलेली असल्याचे म्हणणे पोलिस अधिक्षकांचे आहे.  ख्रिसमस आणि नवे वर्ष सुरु होण्यास अद्याप अनेक दिवस शिल्लक आहेत. मात्र येथील संधीसाधू पर्यटन व्यावसायिकांची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. दरवर्षी रायगडमध्ये होणाऱ्या थर्टीफस्टच्या मद्याचे सेवन, अंमली पदार्थांचा वापर सर्रास केला जातो. यावर्षी मुंबई-पुण्यातील पर्यटक दूरच्या पर्यटनस्थळांवर न जाता जवळच्याच पर्यटनस्थळावर थर्टीफस्टच्या पार्ट्या आयोजित करण्याच्या बेतात आहेत. यासाठी बुकींगदेखील सुरु झाली आहे. 

नेहमीपेक्षा यावर्षी ग्राहकांच्या मागण्या वेगळ्या असून वर्षभरातील अनेक चढउतार, आर्थिक मंदी, लॉकडाऊनमुळे आलेला मानसिक ताण घालवण्यासाठी नशेच्या पदार्थांची विचारणा होऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यातील नोव्हेंबर या एका महिन्यातील नशेच्या पदार्थांचा व्यवसाय कोटींच्या घरातला असतो. चोरी-छुपे चालणाऱ्या या व्यवसायावर पायबंद घालण्यासाठी अनेक उपाययोजना रायगड पोलिस दरवर्षी घालण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही ग्राहकांची प्रचंड मागणी आणि कमी कालावधीत दामदुप्पट नफा मिळत असल्याने अनेक संधीसाधू  व्यावसायिक बनावट दारू विकणे, दिव-दमण, गोवा या राज्यातून कमी किंमतीत दारू आणून विकणे, चरस-गांजा यासारख्या अंमली पदार्थांचा साठा करणे यासारखे प्रकार सुरु केले असून यावर नियंत्रण आणण्यासाठी रायगड पोलिस करीत आहेत.

कोणतीही अनुचित किंवा गैरप्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. येथील व्यावसायिकांनीही मंदीतून सावरण्यासाठी  31 डिसेंबरला महत्त्वाच्या तसेच प्रमुख चेकपोस्टवर  पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार तसेच चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक घडामोडीवर पोलिस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवणार आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, रॅश ड्रायव्हिंग’ विरोधी मोहीम राबविली जाणार असून मद्यपी आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाईल.
 
लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त

दिव-दमण येथून अलिबाग येथे  दारू घेऊन येणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पिंपळभाट येथे अटक केली आहे. या दोघांकडून डस्टर गाडी तसेच लाखोंचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. दोघेजण डस्टर गाडीमध्ये अवैध दारू घेऊन अलिबागमध्ये येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. अशीच कारवाई पनवेल पोलिसांनीही करुन दुसऱ्या राज्यातून आणलेला मद्याचा साठा जप्त केला आहे.

रेव्ह पार्टीसारखे प्रकार या कालावधीत सर्रास चालतात. हा इतिहास लक्षात घेऊन वाहनांची तपासणी, माहितीगारांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष कारवाई अशा तीन स्तरावर ही मोहिम असेल. खालापुरमधील कारवाईतून काही धागेदोरे मिळाले आहेत. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे. नागरिकांना शांततेत नव्या वर्षाचे स्वागत करता यावे, यासाठी हे प्रयत्न आहेत.
अशोक दुधे, जिल्हा पोलिस अधिक्षक, रायगड

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Restorative peddlers Investigation Raigad police New year party

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com