दिल्लीतून येणाऱ्या विमान, रेल्वेंवर निर्बंध? विचार सुरू असल्याबाबत पालकमंत्र्यांची माहिती 

समीर सुर्वे
Saturday, 21 November 2020

दिल्लीत कोव्हिडची दुसरी लाट आली असून अहमदाबादमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार दिल्लीतून येणाऱ्या रेल्वे आणि विमान सेवांवर निर्बंध आणण्याचा विचार करत आहे.

मुंबई : दिल्लीत कोव्हिडची दुसरी लाट आली असून अहमदाबादमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार दिल्लीतून येणाऱ्या रेल्वे आणि विमान सेवांवर निर्बंध आणण्याचा विचार करत आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नसून त्यावर विचार सुरू असल्याचे मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. 

हेही वाचा - धारावीत कोरोनानंतर धुरळा; रस्ता खोदकामामुळे नागरिकांचे आजार वाढले

याशिवाय पुढील 15 दिवस दिल्ली, अहमदाबादमधून येणाऱ्या रेल्वे बंद होण्याची गरज असल्याचे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत, असेही त्यांनी नमूद केले. दिल्लीहून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर चाचणी करण्याचा विचार सरकार करत आहे. हा अहवाल येईपर्यंत त्यांचे विलगीकरण करण्याचाही पर्याय विचारात आहे. तसेच दिल्लीहून येणाऱ्या रेल्वेबाबतही विचार सुरू आहे; मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे शेख यांनी सांगितले. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लांब पल्ल्याच्या रेल्वेंमधून कोव्हिडचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - लव्ह जिहाद विरोधी कायदा करा; मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेण्याचे भाजपचे आवाहन

मुंबईतील कोव्हिड नियंत्रणात आहे. मात्र, अद्याप तो संपलेला नाही. दिल्ली, अहमदाबाद अशा ठिकाणाहून येणाऱ्या रेल्वेमधून कोव्हिडचा प्रसार होऊ शकतो, अशी शक्‍यता नाकारता येत नाही, असे महापौरांनी सांगितले आहे. 

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली; मात्र धार्मिक स्थळांमध्ये होत असलेल्या गर्दीवर महापौरांनी प्रश्‍न निर्माण केला आहे. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर त्यात गर्दी होत असल्याचे सूचक विधान महापौरांनी केले आहे. 

Restrictions on flights and trains from Delhi? Information of the Guardian Minister about the ongoing thinking 
-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions on flights and trains from Delhi? Information of the Guardian Minister about the ongoing thinking