esakal | आरेमध्ये पुन्हा भूमापन? संशयास्पद हालचालींमुळे पर्यावरणवादी सावध 
sakal

बोलून बातमी शोधा

आरेमध्ये पुन्हा भूमापन? संशयास्पद हालचालींमुळे पर्यावरणवादी सावध 

आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; मात्र त्याच जागी पुन्हा एकदा भूमापन सर्वेक्षण सुरू असल्याचे काही पर्यावरणवाद्यांनी समोर आणले आहे.

आरेमध्ये पुन्हा भूमापन? संशयास्पद हालचालींमुळे पर्यावरणवादी सावध 

sakal_logo
By
मिलिंद तांबे


मुंबई : आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; मात्र त्याच जागी पुन्हा एकदा भूमापन सर्वेक्षण सुरू असल्याचे काही पर्यावरणवाद्यांनी समोर आणले आहे. आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द झाला असला तरी काही ठेकेदारांचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे; मात्र आरे कारशेड प्रकल्प रद्द झाल्यानंतरही काही दिवसांतच पुन्हा एकदा संशयास्पद हालचाली सुरू झाल्याने पर्यावरणवादी सावध झाले आहेत. 

हिरड्यांतील रक्तस्त्रावाच्या समस्येत वाढ! दात घासणे, खाण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम; तज्ज्ञांचे मत

आरेमधील प्रस्तावित कारशेड प्रकल्प पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे रद्द करावा लागला. मेट्रो कारशेड प्रकल्प आता कांजूरमार्ग येथे हलवण्यात आला आहे. त्यामुळे आरेमधील सुरू असलेले कामही थांबवण्यात आले. असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा आरे परिसरात भूमापन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामुळे पर्यावरणवादी सावध झाले आहेत. हे सर्वेक्षण नेमके कशासाठी आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न पर्यावरणवाद्यांनी केला; मात्र त्यांना त्याचे नेमके उत्तर मिळालेले नाही. पर्यावरणवादी झोरू बाथेना यांनी या प्रकाराबद्दल आक्षेप नोंदवला आहे. या सर्व हालचाली संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरे कारशेडचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच जागेवर कसले सर्वेक्षण सुरू आहे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. रद्द केलेला प्रकल्प पुन्हा होणे शक्‍य नाही; मात्र तसा प्रयत्न झाल्यास आम्ही दुसऱ्या लढाईसाठीही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवरात्र उपवासात आहाराचा समतोल सांभाळा, प्रतिकार शक्ती टिकवण्याचा आहारतज्ञांचा सल्ला

आरे परिसरातून वाहणाऱ्या मिठी तसेच ओशिवरा नदीच्या दोन्ही बाजूच्या काठावर बऱ्याच ठिकाणी 15 फूट उंचीची भिंत उभारली आहे. या भिंतीला पर्यावरणवादी स्टॅलीन दयानंद यांनी आक्षेप नोंदवला आहे. आरेमधून नैसर्गिक प्रवाहात वाहणाऱ्या नदीच्या काठावर भिंत बांधण्याची काही आवश्‍यकता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुराचे पाणी जंगलात शिरू नये यासाठी भिंत बांधण्यात आल्याचे आरे प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले; मात्र जंगलात पूर कसा येईल आणि याबद्दल कुणी तक्रार केली, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे. 

झाडे सुकवून प्लॉटसाठी षडयंत्र! 
याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही स्टॅलिन यांनी सांगितले. न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल; पण त्याआधी ही भिंत काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांनाही पत्र लिहिले आहे; मात्र त्याची दखल अद्याप घेतलेली नाही. यामुळे स्टॅलीन यांनी संताप व्यक्त केला आहे. यामागे झाडे सुकवून त्या जागी प्लॉट बनवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला आहे. 

सर्वेक्षण नेमके कशासाठी आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधितांनी नेमके उत्तर दिलेले नाही. सर्व हालचाली संशयास्पद आहेत. प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच जागेवर कसले सर्वेक्षण सुरू आहे? रद्द केलेला प्रकल्प पुन्हा होणे शक्‍य नाही; मात्र तसा प्रयत्न झाल्यास आम्ही दुसऱ्या लढाईसाठीही तयार आहोत. 
- झोरू बाथेना,
पर्यावरणवादी 

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )