रेवस- करंजा खाडी पूल पुन्हा दृष्टिक्षेपात

रेवस : करंजा खाडीवर पूल नसल्याने मुरूड, अलिबाग, उरण आणि नवी मुंबईतील प्रवाशांना बोटींचा अाधार घ्यावा लागतो.
रेवस : करंजा खाडीवर पूल नसल्याने मुरूड, अलिबाग, उरण आणि नवी मुंबईतील प्रवाशांना बोटींचा अाधार घ्यावा लागतो.

अलिबाग : अलिबाग-नवी मुंबई हे अंतर तब्बल २० किलोमीटरने कमी करणाऱ्या रेवस-करंजा (उरण) खाडी पुलाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. हिवाळी अधिवेशनात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी यासाठी आग्रही भूमिका मांडली. हा दीर्घ प्रतीक्षेत असलेला प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही नवी झळाली लाभणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी या पुलासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. 

अलिबाग आणि उरण या दोन तालुक्‍यांना जोडणाऱ्या खाडी पुलाची चर्चा १९७० पासूनच सुरू झाली होती. त्यानंतर १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूदही केली होती. काही कामेही सुरू झाली होती; परंतु बॅ. अंतुले मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर १९८२ मध्ये लगेचच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यानंतर हे स्वप्नच राहिले. या वेळी हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी हा पूल व्हावा, हा मुद्दा उचलून धरला. बॅ. अंतुले यांनी या पुलाचे स्वप्न पाहिले होते, असे सभागृहाच्या निदर्शनास आणले. 

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अलिबाग आणि मुरूड तालुक्‍यात पर्यटन व्यवसाय भरभराटीस येणार आहे. पुढे श्रीवर्धनलाही त्याचा चांगला उपयोग होणार आहे. स्थानिकांसह पर्यटकांसाठी हा मार्ग अतिशय सुखकर होणार आहे. वेळ व पैसा वाचणार आहे. या प्रश्‍नाबाबत काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पाठपुरावा केला होता. आमदार दळवी यांनी या प्रकल्पाबाबत आवाज उठवल्याने आशा प्रल्लवित झाल्या आहेत. सध्या अलिबागहून उरणला जाण्यासाठी अलिबाग-वडखळ-खारपाडा असा प्रवास करावा लागतो. 

असे होणार अंतर कमी 
करंजा (उरण)- रेवसदरम्यान खाडी पूल झाला तर वाशी-रेवस हे अंतर ३९ किलोमीटरने कमी होणार आहे. वाशी ते मांडवा हे अंतर ३९ किलोमीटर, उरण-अलिबाग अंतर ४४ किलोमीटर आणि जेएनपीटी-अलिबाग अंतर ३५ किलोमीटर कमी होणार आहे. जेएनपीटी-मुरूड अंतर ३६ किलोमीटरने कमी होईल. अलिबाग-मुंबई प्रवास करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करावा लागतो, हे अंतरही पुलामुळे कमी होणार आहे. 

असा आहे महत्त्वाचा प्रकल्प
पनवेल, उरण तालुक्‍यांत अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये विमानतळ, न्हावा सागरी सेतू हे दोन महत्त्वाकांक्षी आहेत. शिवडी सेतूवरून उरणमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवासी करंजा खाडीवर पूल झाल्यास कमी वेळेत अलिबाग, मुरूडला पोहचू शकतात. विमानतळ आणि जेएनपीटी बंदराला जोडण्यासाठीही हा पूल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 

बॅ. ए. आर. अंतुले करंजा- रेवस पूल व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे काम थांबले आहे. हा पूल झाल्यास अलिबाग मुंबईच्या अगदी जवळ येईल. - महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग 

रेवस-करंजा पूल झाल्यास नवी मुंबईमध्ये लवकर पोहचता येणार आहे. या पुलाचे काम एमएमआरडीएकडे आहे. तो लवकरच होणार आहे. 
- जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com