रिया शोविकच्या जामिनाला NCB चा विरोध, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सुनीता महामुणकर
Tuesday, 29 September 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टाने निकाल राखून ठेवलाय 

मुंबई, ता. 29 : ड्रग्ज बाळगणे हा हत्येपेक्षाही गंभीर गुन्हा असून यामुळे संपूर्ण समाजव्यवस्था बाधित होऊ शकते, त्यामुळे मौडेल अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह शौविक आणि अन्य आरोपींना जामीन मंजूर करु नये, असा युक्तिवाद आज अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या ( एनसीबी ) वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. दरम्यान,  सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

रिया, शौविकसह अन्य तीन आरोपींनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. जामिनावर आज न्या सारंग कोतवाल यांच्यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनील सिंह यांनी जामीनाला विरोध केला. हत्येच्या गुन्ह्यात व्यक्ती आणि परिवारावर परिणाम होतो मात्र अमलीपदार्थ सेवनामुळे तरुण पिढी आणि संपूर्ण समाज उध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे या कायद्यात आरोपींना जामीन मंजूर होता कामा नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. सीबीआय मृत्यूचा तपास करीत आहे आणि एनसीबी अमलीपदार्थांचा गुन्ह्याचा. दोन्ही वेगळे आहेत. तसेच आरोपीला तपास यंत्रणा निवडण्याचा अधिकार नाही, असा दावाही त्यांनी केला.

महत्त्वाची बातमी : मुंबईतील नियम अधिक कडक, No Mask! No Entry! मास्‍कशिवाय बेस्‍ट बस, टॅक्‍सी, रिक्षात प्रवेश नाही

रिया शौविकच्या वतीने एड. सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तपास यंत्रणेने रिया शौविकवर अमलीपदार्थ विकल्याचा अथवा सेवन केल्याचा आरोप केला नाही तसेच जो उल्लेख आहे तो अभिनेता सुशांतसिंहच्या ड्रग सेवनाचा आहे, असा दावा केला. त्यामुळे त्यांनी कधीही त्याचा व्यवसाय केला नाही आणि सेवन केलेले नाही, तरीही एनसीबीने कठोर आरोप ठेवले आहेत, असे मानेशिंदे यांनी मांडले.  ड्रग घेतले म्हणून अटक झाली असती तर सहा महिने ते एक वर्ष शिक्षेची तरतूद आहे. पण रिया शौविकवर मात्र एनडीपीएसच्या कलम 27 अ नुसार दहा वर्षे शिक्षेचा आरोप ठेवला आहे, असा विरोधाभासवरही त्यांनी युक्तिवाद केला.

न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. रिया बावीस दिवसांपासून  न्यायालयीन कोठडीत आहे.

( संपादन - सुमित बागुल )

rhea chakraborty and her brothers bail plea on hold by court

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty and her brothers bail plea on hold by court