30 टक्के भातशेती क्षेत्र घटले 

अरविंद पाटील
बुधवार, 11 डिसेंबर 2019

भातपिकाबरोबरच कडधान्य लागवडीखालील क्षेत्रातही सातत्याने घट होत आहे. गेल्या तीन वर्षात हिवाळी कडधान्य लागवडीखालील क्षेत्रात पाच हजार हेक्‍टर एवढी घट आली आहे; 

रोहा : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून राज्यात लौकीक असलेला रायगड जिल्हा भातशेती क्षेत्रात झपाट्याने कमी होऊ लागला आहे. तीन वर्षांतील त्याचा वेग खूपच मोठा असून या कालावधीत तब्बल 42 हजार हेक्‍टर (सुमारे 30 टक्के) क्षेत्र कमी झाले आहे. खरीपाच्या लागवडीखालील क्षेत्रालाही फटका बसला आहे. बदलते हवामान, नगदी पिकांकडे वाढलेला कल, बांधकामे आदी कारणांचा हा परिणाम आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात भातशेतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे हे पीक गेल्या 50 वर्षांत पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. परंतु, मुंबईच्या शेजारचा जिल्हा असल्याने रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होत आहे. शेतजमिनी उद्योगांच्या नावाखाली संपादित करण्यात येत आहेत.
 
त्यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण 450 हेक्‍टर, दिल्ली मुंबई-कॉरिडोर चार हजार हेक्‍टर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर 10 हेक्‍टर, बाळगंगा धरण प्रकल्प एक हजार 213 हेक्‍टर, खालापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा दोन 9 हेक्‍टर, नवी मुंबई विमानतळ 684 हेक्‍टर, असे मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीला उद्योगांचे ग्रहण लागले असून हे क्षेत्र 39 हजार हेक्‍टरने कमी झाले आहे. 

बदलत्या हवामानामुळे भातशेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. इमारती, घरे आदींसाठीही मोठ्या प्रमाणात याच प्रकारच्या शेतीवर अतिक्रमण झाले आहे. त्याचाही परिणाम दिसत आहे. याशिवाय भाजीपाला, फुलशेती, फळबागा यांचे क्षेत्र वाढले आहे. 

भातपिकाबरोबरच कडधान्य लागवडीखालील क्षेत्रातही सातत्याने घट होत आहे. गेल्या तीन वर्षात हिवाळी कडधान्य लागवडीखालील क्षेत्रात पाच हजार हेक्‍टर एवढी घट आली आहे; 
तर खरीपाची लागवड जवळपास 27 हजार हेक्‍टरने घटली आहे. 

शेतजमिनीचे संपादन, भातशेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नाही. शिवाय तरुण पिढीला शेतीपेक्षा नोकरी अधिक प्रतिष्ठेची वाटत असल्याने शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. शेती कमी होत चालली आहे, हे चिंताजनक आहे. 
- संजय पशीलकर, बळिराजा शेतकरी संघर्ष संघ, रायगड जिल्हा अध्यक्ष 

न परवडणारी भातशेती, नोकरीला मिळणारी प्रतिष्ठा आदी कारणांमुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. यावर्षी 95 हजार हेक्‍टर जमिनीवर भात आणि सात ते आठ हजार हेक्‍टरवर कडधान्य लागवड झाली आहे. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice area decreased by 30 percent