रिक्षावाल्याने देवदूत बनून वाचविले महिलेचे प्राण

अक्षय गायकवाड
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई -  'दिल के हम अमीर है' या उक्तीप्रमाणे हृदय असणाऱ्या एका रिक्षाचालकाने हृदय विकाराचा झटका आलेल्या महिला वकीलाचे प्राण वाचविले. त्याबाबत वकिलाने पैसे देऊ केले असता रिक्षाचालकाने ते नाकारले आणि माणुसकी जिवंत असल्याची साक्ष दिली.

मुंबई -  'दिल के हम अमीर है' या उक्तीप्रमाणे हृदय असणाऱ्या एका रिक्षाचालकाने हृदय विकाराचा झटका आलेल्या महिला वकीलाचे प्राण वाचविले. त्याबाबत वकिलाने पैसे देऊ केले असता रिक्षाचालकाने ते नाकारले आणि माणुसकी जिवंत असल्याची साक्ष दिली.

सुमिता जगताप या वकिलाला जानेवारीत कुर्ला येथे हृदय विकाराचा झटका आला होता. यानंतर सुमारे अडीच महिन्यांनंतर सुमिता यांनी त्याचा शोध घेतला. विनोद सरोदे असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे. देशात घडत असलेल्या अनेक घटनांमुळे माणुसकी हरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकांच्या असहायतेचा फायदा घेतला जात आहे. अशा परिस्थितीत माणुसकी जिवंत असल्याची ही घटना कुर्ला येथे घडली आहे. 

मुलुंडमधील सुमिता या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कुटुंब न्यायालयात गेल्या होत्या. जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हृद्याची धडधड वाढू लागली. त्यावेळी कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून कोणाला न सांगता त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी न्यायालयाच्या जवळून कुर्ला स्थानकाकडे जाण्यासाठी शेअर रिक्षा पकडली. या रिक्षात अगोदरपासूनच दोन प्रवाशी होते. सुमिता यांची तब्येत अजून खालावत गेली. आजूबाजूच्या दोन्ही प्रवाशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. रिक्षा कुर्ला स्थानकापर्यंत पोहचली. तिथपर्यंत जगताप यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. दोन्ही प्रवाशी लक्ष न देता निघून गेले. सुमिता रिक्षातून बाहेर पडताही येत नव्हते. आपण हे जग सोडतोय की काय? असे त्यांना वाटू लागले होते. 

रिक्षाचालक असलेला विनोद यांचे लक्ष याचवेळी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांना जवळील पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. सरोदे यांनी विल चेअरमध्ये बसवून आपत्कालीन विभागात जगताप यांना नेले. नेत असताना जगताप यांनी माझ्या बहिणीला बोलवा, असे सरोदे यांना सांगितले. तसे सरोदे यांनी फोनद्वारे त्यांच्या बहिणीला कळविले. बहीण येईपर्यंत त्यांची काळजी घेत सरोदे रुग्णालयात होते. 

सुमिता यांना राजावाडी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथील डॉक्टरांनी सांगितले की, ''तुम्ही रुग्णाला वेळेवर आणले, नाहीतर आम्हाला त्यांना वाचवता आले नसते''. काही दिवसांनंतर उपचार घेऊन त्या घरी परतल्या. 

दोन महिने घरी विश्रांती घेतल्यावर त्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण सरोदे या देवदूताची भेट होत नव्हती. पाच दिवस जगताप कुर्ला पश्चिम येथील शेअर रिक्षा स्टँड जवळ रिक्षाचालकाला शोधत होत्या. अखेर पाच एप्रिल रोजी त्या चालकासारखा एक जण त्यांना दिसला. मग विचारपूस केली असता त्या रिक्षाचालकाने तो मीच असल्याचे सांगितले. तेव्हा जगताप यांना त्याचे नाव कळाले. आपले प्राण ज्या व्यक्तीने वाचविले तो देवदूत भेटला म्हणून त्यांनी सरोदे याचे आभार मानले.

Web Title: rickshaw driver saved Woman's life