वांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे!; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास

ब्रह्मा चट्टे 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

राज्याचे परिवहन विभाग कार्यालय ज्या ठिकाणी आहे, त्या वांद्रे येथे रिक्षावाल्यांची मुजोरी चालली आहे. वांद्रे स्टेशनवरून अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची मजोरीकडे परिवहन विभागाच 'अर्थपुर्ण' कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

मुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटतात. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच आठवड्यात रिक्षा पलटी होऊन एक प्रवासी गंभीर जखमी झाला असतानाही पुन्हा मुजोर रिक्षाचालक फुटपाथवरून रिक्षा चालवतात. विशेष म्हणजे परिवहन विभागाचे मुख्यालय हाकेच्या अंतरावर आहे.

राज्याचे परिवहन विभाग कार्यालय ज्या ठिकाणी आहे, त्या वांद्रे येथे रिक्षावाल्यांची मुजोरी चालली आहे. वांद्रे स्टेशनवरून अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची मजोरीकडे परिवहन विभागाच 'अर्थपुर्ण' कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. परिवहन आयुक्तालयाच्या नाकाखाली 'वांद्रे स्थानकाबाहेर रिक्षावाल्यांची मुजोरी' या मथळ्याखाली दै सकाळने सोमवार दि. 22 जुलै ला बातमी दिली होती. त्यानंतर या बातमीची तात्काळ दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. या ठिकाणी होत असलेल्या गैरप्रकाराविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश रावते यांनी दिले. परिणामी परिवहन अधिकाऱ्यांने केलेल्या कागदपत्र तपासणी कार्यवाहीत 24 रिक्षा बेकायदेशिरपणे विना मिटर प्रवाशी वाहतूक करत असल्याचे लक्षात आले. या रिक्षांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली अाहे. ही कार्यवाही केल्यानंतरही पुन्हा रिक्षावाल्यांचे ये रे माज्या मागल्या सुरूच असून रिक्षावाल्यांनी आपली दादागिरी सुरूच ठेवली आहे. 

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरून रिक्षा मिळवण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. या ठिकाणी फक्त शेअर रिक्षाच मिळतात. मिटरने येण्यासाठी एकही रिक्षावाला तयार होत नाही. बाहेरच्या रिक्षावाल्याने मिटरने प्रवाशी घेतल्यास स्थानिक रिक्षावाले त्या रिक्षावाल्याला मारायला धावतात. रस्त्यांवरून चालणाऱ्यांसाठी फुटपाथ बनवली असतानाही या ठिकाणी रिक्षा चक्क फुटपाथवरून दामटली जाते. रिक्षावाल्यांच्या या दादागिरीमुळे स्थानिकचे रहिवाशी आपला जीव मुठीत घेवूनच प्रवास करत असल्याचे चित्र आहे. 

'सकाळ'ने छापलेल्या बातमी दखल घेवून आम्ही या भागात मीटर तपासणीची कारवाही सुरू केली आहे. रिक्षावाल्यांनी फुटपाथवरून रिक्षा चालवणे हा प्रकार गंभीर असून याची दखल घेऊन त्याठिकाणी कामावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याची तात्काळ सूचना करत आहे.' - शेखर चन्ने, आयुक्त परिवहन विभाग

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rikshaws are traveling on the vandre mumbai Footpath