आरोग्यासाठी 'ते' खेळतायेत जीवाशी!

आरोग्यासाठी 'ते' खेळताहेत जीवाशी!
आरोग्यासाठी 'ते' खेळताहेत जीवाशी!

नवी मुंबई : सुनियोजित शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत जॉगिंग ट्रॅकची संख्या अपुरी असल्याने पहाटे व संध्याकाळी फेरफटका मारण्यास बाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाम बीच, सेवारस्ते आणि उद्यानांतील; तसेच अंतर्गत रस्त्यांशेजारील पदपथाचा वापर ‘जॉगिंग ट्रॅक’प्रमाणे होताना दिसत आहेत. हा त्यांच्या जीवाशी खेळ आहे. त्यावर आजपासून वृत्तमालिकेद्वारे टाकण्यात येत असलेला हा प्रकाशझोत...

सीवूडसमध्ये अक्षर टॉवरला लागून असलेल्या सेवारस्त्यावर जवळपास ६०० ते ७०० नागरिक सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येतात. या रस्त्यावर जून २०१९ मध्ये रात्रीच्या सुमारास फेरफटका मारण्यास आलेल्या आई व मुलाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. या मार्गावर सकाळ-संध्याकाळी व्यायामासाठी येणाऱ्या लोकांची खूपच वर्दळ असल्याने, तो वाहतुकीसाठी बंद करण्याची; तसेच परिसरात जॉगिंग ट्रॅक उभारण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली होती. त्यावेळी वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला; मात्र जॉगिंग ट्रॅकच्या मागणीचे पुढे काहीच झाले नाही. या सेवारस्त्यापासून सेक्‍टर- ४२ मधील अंतर्गत रस्त्यावर नवरत्न हॉटेल, पुढे सेक्‍टर- ५० पासून सेवारस्त्यावरील बस डेपोपर्यंतच्या सर्कलजवळ नागरिक वॉकिंग किंवा जॉगिंग करताना दिसतात. याव्यतिरिक्त सेक्‍टर- ४२ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, सेक्‍टर- ४० मधील महात्मा फुले उद्यान, तांडेल मैदान, करावे पार्क आदी ठिकाणी जॉगिंगसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

ट्रॅक असलेले एकमेव ठिकाण
नेरूळमधील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे सीवूडस आणि नेरूळकरांचे फेरफटका मारण्यासाठीचे आवडते ठिकाण आहे. ट्रॅक असलेले हे एकमेव ठिकाण असून, या ठिकाणी तलावाभोवताली २.६ किलोमीटरचा ट्रॅक आहे. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ जवळपास पाचशे अधिक नागरिक फिरण्यासाठी येतात. येथील गर्दी टाळण्यासाठी अनेक जण पाम बीच रस्त्याचा वा पदपथाचा वापर ट्रॅकप्रमाणे करताना दिसतात. 

आमचा समूह गेली १५ वर्षे जॉगिंग करतो. पूर्वी आम्ही पाम बीचजवळ, पालिका मुख्यालयाजवळ जायचो. ज्वेल ऑफ नवी मुंबईचा ट्रॅक झाल्यापासून तेथे जायला लागलो. पालिका सुविधा देते. पण त्याची देखभाल व्यवस्थित करण्यात येत नाही. तांडेल मैदानाकडे खुल्या जिमची दुरवस्था, उद्यानातील अपुरी प्रकाशयोजना; तसेच प्राण्यांची विष्ठा, तलावात सोडलेले सांडपाणी व पुरेशी स्वच्छता नसल्याने पसरणारी दुर्गंधी, तुटलेली बाके या व अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पालिकेने या गैरसोयी दूर करायला हव्यात. 
- ॲड. सुरेश भोसले, ज्येष्ठ नागरिक, सीवूडस

सीवूडस सेक्‍टर- ४६ मधील पालिकेच्या मैदानामध्ये २ मीटर रुंदीचे जॉगिंग ट्रॅक बनवण्यासाठीचा ठराव पालिकेसमोर ठेवला होता. त्याकरिता ३५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यास सकाळ-संध्याकाळी जॉगिंगसाठी बाहेर पडणाऱ्या जवळपास ६०० ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुषांसाठी सोईचे होईल.
- गणेश म्हात्रे, नगरसेवक, सीवूडस.

लोक आरोग्याविषयी अधिक सतर्क झाले आहेत. त्यामुळे सकाळी जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सीवूडसमधील नागरिकांना परिसरातील उद्यान सोडल्यास इतर पर्याय उपलब्ध नाही. ज्वेल ऑफ नवी मुंबईत ट्रॅक आहे. पण प्रत्येकालाच तिथे जाणे शक्‍य नाही. त्यामुळे नागरिक अंतर्गत रस्ते, पदपथ वा पाम बीचला फेरफटका मारण्यासाठी जातात. पालिकेच्या मैदानांमध्ये जॉगिंग ट्रॅक करता येऊ शकतात. पालिकेने त्या दृष्टीने पाऊल उचलल्यास उपयुक्त ठरू शकते. 
- राजेंद्र कोंडे, सीवूडस.

पाम बीचवर सकाळी मोठ्या प्रमाणावर लोक सायकलिंग व जॉगिंग करताना दिसतात. अशा वेळी अनवधानाने अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने उपलब्ध जागेत ट्रॅक केल्यास ते सोईचे ठरू शकते.
- मंगल चव्हाण, सीवूडस.

उद्यानांमध्ये आपण ट्रॅकची (उद्यानांतर्गत पेव्हर ब्लॉक टाकलेले पदपथ) व्यवस्था केली आहे. नवीन उद्याने होतील, तेव्हाही तिथे अशीच सोय केली जाईल.
- प्रकाश गिरी, उद्यान अधीक्षक (प्र.), बेलापूर, नेरूळ विभाग.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com