ठाण्यात पुन्हा रस्तारुंदीकरण 

राजेश मोरे
रविवार, 8 डिसेंबर 2019

शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांत सातत्याने रस्तारुंदीकरण मोहीम राबविण्यात आली; मात्र त्यानंतर ही मोहीम थंडावली. पण पुन्हा एकदा रस्तारुंदीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे.

ठाणे : शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांत सातत्याने रस्तारुंदीकरण मोहीम राबविण्यात आली; मात्र त्यानंतर ही मोहीम थंडावली. पण पुन्हा एकदा रस्तारुंदीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रस्तारुंदीकरणासाठी आवश्‍यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश बांधकाम विभागासह अतिक्रमण विभागाला दिल्याचे समजते. 

मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असलेल्या ठाणे शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे ठरत होते. त्यामुळे अनेक रस्ते वाहतूक कोंडीची ठिकाणे ठरत होते. त्यावर उपाय म्हणून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्तारुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने रेल्वेस्थानक रोड, पोखरण रोड क्रमांक एक आणि दोन, कापूरबावडी, शास्त्रीनगर येथील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे.

त्याचबरोबर कळवा आणि मुंब्य्रातील काही प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. पोखरण रोड क्रमांक एक आणि दोन यांचे रुंदीकरण झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यातही सायंकाळी हा रस्ता वाहनचालकांना नकोसा वाटत होता. मात्र आता या रस्त्यावर पूर्वीइतकी वाहतूक कोंडी आढळत नाही. 

येथील रस्त्यांचे रुंदीकरण 

  • बाजारपेठ स्मशानभूमी 

बाजारपेठेतील स्मशानभूमीपासून रेल्वेस्थानकाजवळील अशोक सिनेमापर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून याचा वापर करणे शक्‍य आहे. पण येथे लहान-लहान दुकानांची मोठ्या संख्येने रांग आहे. हा रस्ता अरुंद असल्याने या रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्यास येथे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे येथील रस्तारुंदीकरणात बाधित होणारी दुकाने हटवली जाणार आहेत. सुमारे शंभर बांधकामांवर या परिसरात कारवाई होणार आहे. 

  • बाळकुम राममारुती नगर 

घोडबंदर रस्त्याबरोबरच बाळकुम परिसरात नागरी वसाहती वाढत आहेत. त्यामुळेच बाळकुम भागातील राममारुती नगर येथील रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या हा रस्ता 12 फुटांचा आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून त्याची रुंदी चोवीस फूट केली जाणार आहे. येथील विस्थापित होणाऱ्यांची संख्या जास्त असून किमान 350 बांधकामांवर येथे कारवाई होणार असल्याचे समजते. त्याचबरोबर वागळे इस्टेट भागातील कामगार रुग्णालयापर्यंत रस्ता रुंद करण्यात आला आहे. मात्र त्यापुढील रस्ता आता अरुंद ठरू लागला आहे. त्यामुळे कामगार रुग्णालयापासून इंदिरानगर नाक्‍यापर्यंत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. 

  • सुमारे 550 हून अधिक दुकानदार अथवा घरांवर हातोडा 
  • बाधितांना जवळच्या परिसरात पर्यायी जागा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road widening again in Thane