राज्याच्या पर्यटन ब्रॅंडिंगसाठी कोलकातामध्ये रोड शो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

विविध राज्यांतील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याचा उद्देश 

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धी व ब्रॅंडिंगसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीने कोलकाता येथे नुकतेच रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोच्या माध्यमातून तेथील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्राचे समृद्ध पर्यटन या वेळी सादर करण्यात आले. रोड शोला पर्यटन संचालक दिलीप गावडे, औरंगाबाद विभागीय पर्यटन उपसंचालक श्रीमंत हरकर उपस्थित होते. 

पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले, "महाराष्ट्राला प्राचीन, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. राज्यातील पर्यटनाला विकासाच्या दिशेने नेताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पर्यटन संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येतात. राज्यात समुद्र किनारा, किल्ले, लेण्या, गुंफा अशी बरीच पर्यटनस्थळे आहेत. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांना व्हावी व त्यांनी या स्थळांना भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा, यासाठी विविध माध्यमांतून प्रसिद्धी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे देशांतर्गत रोड शोचे आयोजन केले जाते. कोलकाता येथे झालेल्या रोड शोला चांगला प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटनावर आधारित सादरीकरण, बी टू बी चर्चासत्रे व प्रश्‍नोत्तरे तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पर्यटकांनी महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. पर्यटनाशी निगडीत सुमारे 80 व्यावसायिक, सहल आयोजक व नामांकित ट्रॅव्हल एजंट यांच्यासमवेत चर्चा करून त्यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधीची माहिती देण्यात आली. 

पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचा उद्देश 
देशांतर्गत विविध राज्यांतील पर्यटकांना, सहल आयोजकांना व पर्यटन व्यावसायिकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणे, पर्यटनाशी निगडीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, पारंपरिक कला- संस्कृती, हस्तकला, पाककृती आदींची ओळख करून देणे व त्यांच्याशी व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून विविध राज्यांतील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करणे हा रोड शोचा मुख्य उद्देश होता, असे पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roadshow in Kolkata for state tourism branding