चोरीच्या बाईक नंबरमुळे लागला छडा; घरफोडी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal Arrested

बंद घरावर डल्ला मारून चोरट्याने घरातील सोन्याचे कॉइन व दागिने चोरून नेल्याची घटना डोंबिवलीत घडली होती.

चोरीच्या बाईक नंबरमुळे लागला छडा; घरफोडी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक

डोंबिवली - बंद घरावर डल्ला मारून चोरट्याने घरातील सोन्याचे कॉइन व दागिने चोरून नेल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. सीसीटीव्ही मध्ये हे चोरटे कैद झाले असताना गुन्ह्यात वापरलेल्या बाईकच्या नंबरवरून विष्णुनगर पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावला आहे. विष्णू भांडेकर (वय 24) आणि शंकर पवार (वय 30) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 4 लाख 71 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

डोंबिवली पाश्चिमेत अरुणोदय सोसायटीमध्ये प्रकाश शिंपी राहतात. 21 सप्टेंबरला ते कुटुंबासह दादर याठिकाणी गेले असता दिवसा ढवळ्या चोरट्यानी घरातील सोन्याचे कॉईन, दागिने, रोख रक्कम असा सुमारे 9 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकाश हे घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला व किचनचे खिडकीचे काचा फुटलेल्या व ग्रील तुटलेल्या अवस्थेत होते. कपाट देखील उघडे असल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यादृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या पथकाने शोध सुरू केला. सीसीटीव्ही मध्ये चोरट्याची बाईक कैद झाली होती. या बाईकवरील नंबर वरून चोरटे हाजीमलंग रोड परिसरात असल्याची माहिती पोलीस शीपाई कुंदन भामरे यांना मिळाली. विष्णुनगर पोलिसांनी सापळा रचून विष्णू व शंकर यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 4 लाख 71 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.