विरार स्थानकात सरकत्या जिन्यावर प्रवाशाला बेदम मारहाण करून लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery beating passenger.

विरार स्थानकात सरकत्या जिन्यावर प्रवाशाला बेदम मारहाण करून लूट

नालासोपारा - विरार रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यावर एकट्या प्रवाशाला गाठून 4 चोरट्यांच्या टोळीने त्याला बेदम मारहाण करत त्याची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 मे रोजी रात्री अडीच वाजताची ही घटना असून, चोरट्या च्या मारहाणीचा सर्व थरार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्याने सर्व प्रकार उघड झाला आहे. दिवस रात्र रेल्वेस्थानाकात रेल्वे पोलीस गस्तीवर असतात पण तरीही एकट्या प्रवाशाला गाठून 4 चोरट्याने बेदम मारहाण करून फरार झाल्याने कर्तव्यावरील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

पश्चिम रेल्वेचे शेवटचे विरार रेल्वे स्थानक आहे. रात्री अडीच पर्यंत या स्थानकावर लोकलची रहदारी सुरू असते. मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकावर प्रवाशांची गर्दी ही ओसरलेली असते. याच संधीचा फायदा घेऊन, 4 चोरट्या च्या टोळीने सरकत्या जिन्यावर एका प्रवाशाला गाठून त्याला मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल, घेऊन फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

15 मे रोजी रात्री 2 वाजून 30 मिनिटांचा हा थरार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याचा थरार कैद झाला. प्रथम 3 चोरटे सरकत्या जिन्यावरून ब्रिजवर येतात, तर एक चोरटा प्रवाशाच्या अवतीभोवती फिरत त्याच्या सोबतच सरकत्या जिन्यावर येतो. जिन्याच्या मध्यभागी येताच त्याला अचानक मारहाण करायला सुरुवात करतो, प्रवाशी आणि एका चोरट्यात मारहाण सुरू होते, प्रवाशी स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे अन्य तीन साथीदार ही त्याच्याजवळ पोहोचून त्याला अक्षरश: जिन्यावरून खेचत वर आणतात, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून प्रवाशाजवळील ऐवज, मोबाईल घेऊन फरार झाल्याचे व्हिडिओत दिसते. प्रवाशी काहीवेळ रक्ताबंबाळ अवस्थेत जिन्याजवळच थांबून नंतर निघून जातो. पण मध्यरात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या सरकत्या जिन्यावर हा प्रकार सुरू असताना एकही पोलीस त्या ठिकाणावर येत असताना दिसत नाही. मग त्या दिवशी पूर्ण रेल्वेस्थानाकात एकही पोलीस ड्यूटीवर नव्हता का?, होते तर मग ते कुठे गेले होते? असा प्रश्न उपस्थित होतोय.