esakal | "रॅपिड बाईक टॅक्‍सी'वर आरटीओचा लगाम; मुंबई उपनगरांत चार दिवसांत 17 वाहनांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीचालकांचा परवाना

सध्या मुंबईत उपनगरात सहा ते 10 रुपये प्रतिकिलोमीटर दराने भाडे आकारून दुचाकीने प्रवाशांची वाहतूक करण्याचा प्रकार सुरू आहे.

"रॅपिड बाईक टॅक्‍सी'वर आरटीओचा लगाम; मुंबई उपनगरांत चार दिवसांत 17 वाहनांवर कारवाई

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : मुंबई उपनगरात सध्या ऑनलाईन ऍप बेस्ड रॅपिड बाईक टॅक्‍सीतून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने दुचाकीने प्रवासी वाहतूक करण्याचा हा प्रकार आहे; मात्र अद्याप अशा प्रवासी वाहतुकीला राज्य सरकारच्या परिवहन विभागाची परवानगी नसल्याने दुचाकीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या 17 दुचाकींवर आरटीओने कारवाई केली आहे. 

ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रदूषण वाढले, कोव्हिड रुग्णांनी खबरदारी घेण्याची गरज


सध्या मुंबईत उपनगरात सहा ते 10 रुपये प्रतिकिलोमीटर दराने भाडे आकारून दुचाकीने प्रवाशांची वाहतूक करण्याचा प्रकार सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपनीच्या ऍपवर अशा दुचाकीचे बुकिंग करण्याचा पर्याय आहे; मात्र या दुचाकीच्या प्रवासी वाहतुकीला अद्याप परिवहन विभागाची मान्यता नसतानाही सर्रास प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शनिवारपासून प्रादेशिक परिवहन विभागाने अशा 17 दुचाकींवर कारवाई केली असून, त्यापैकी तीन प्रकरणे न्यायालयात दाखल केल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी सांगितले. 

दुचाकीवर कारवाई, कंपन्यांचे काय? 
नामांकित कंपन्यांकडून सध्या ऍप बेस्ड दुचाकी प्रवासी वाहतूक सुरू आहे. ओला, उबरच्या प्रवासी वाहतुकीला अद्याप सरकारची परवानगी नाही. त्याप्रमाणे दुचाकी प्रवासी वाहतुकीला कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून जर दुचाकी प्रवासी वाहतुकीवर कारवाई केली जात असल्यास त्याचे ऑनलाईन प्रवासी बुकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे का, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे. 

काही दुचाकीचालकांचा परवाना आणि आरसी रद्द केले आहे. मोटर वाहन कायद्याअंतर्गत विविध प्रकारची कारवाई केली आहे. दुचाकीने प्रवासी वाहतूक करण्याचा प्रकार नवीनच असल्याने यासंदर्भात परिवहन विभागाकडे वेळोवेळी माहिती दिली जात आहे. परिवहन विभागाकडून कारवाईचे नियम ठरल्यावर त्याप्रमाणे अशा दुचाकी आणि कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. 
- अभय देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी 

(संपादन- बापू सावंत)
 

loading image
go to top