कोरोनाचा 'आरटीओ'लाही फटका; महसूल घटल्याने 'या' वाहनधारकांकडे वळवणार मोर्चा

राहुल क्षीरसागर
Monday, 10 August 2020

कोरोनामुळे पुकारलेल्या टाळेबंदीचा सरकारी कार्यालयांनाही फटका बसला आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन विभागही सुटले नसून, कोरोनामुळे यावर्षी वाहन विक्री मंदावल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या महसुलात कमालीची घट झाली. त्यामुळे ही घट भरून काढण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जुन्या वाहनांवरील थकीत कर वसुलीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : कोरोनामुळे पुकारलेल्या टाळेबंदीचा सरकारी कार्यालयांनाही फटका बसला आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन विभागही सुटले नसून, कोरोनामुळे यावर्षी वाहन विक्री मंदावल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या महसुलात कमालीची घट झाली. त्यामुळे ही घट भरून काढण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जुन्या वाहनांवरील थकीत कर वसुलीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, कर थकबाकी असलेल्या वाहन धारकांना 'डिमांड नोटिसा' पाठविण्यात येत आहेत.

क्लिक करा : व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले; सणासुदीच्या काळात ग्राहकांनी फिरवली पाठ

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. जिल्ह्यातील परिवहन विभागांना दरवर्षी वाहन खरेदीतून मोठे उत्पन्न मिळते. रस्ते कर, पर्यावरण कर, वाहन नोंदणी कर, परवाना नूतनीकरण कर, परमीट कर अशा विविध करांच्या स्वरुपात कोट्यवधींचा महसूल गोळा होतो. त्यातच जानेवारी ते जुलै या कालावधीत बस, जड-अवजड वाहने आणि चारचाकी वाहनांची खेरदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या सात महिन्यांत ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तिन्ही उप प्रादेशिक कार्यालयांमधून 250 कोटींहून अधिक महसूल मिळतो.

क्लिक करा : गणेशभक्तांना दिलासा; गणपती बाप्पाची मूर्ती थेट येणार दारी

यंदा मात्र कोरोनामुळे वाहन विक्रीत कमालीची घट झाल्याने त्याचा परिणाम महसुलावर झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत यंदा घट झाल्याचे दिसून आले. महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी जुने थकीत कर वाहनधारकांना डिमांड नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या जुन्या थाकीबाकीधारकांकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून महसुलातील घट भरून काढण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा प्रादेशिक परिवहन विभागाने केला आहे.

कोरोनामुळे नागरिकांचा नवीन वाहन खरेदीकडे कल कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाला करातून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी जुने कर थकीत वाहनधारकांना डिमांड नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 
- रवी गायकवाड, 
प्रादेशिक परिवहन विभागप्रमुख, ठाणे  

---------------------

(संपादन : प्रणीत पवार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO's tax collection begins as revenue declines