कळव्यातील पदपथांवर दुकानदारांची मुजोरी

किरण घरत
Wednesday, 4 December 2019

कळवा-खारीगाव परिसरातील कळवा-बेलापूर रस्त्यावर ठाणे महापालिकेने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने सुरक्षितपणे चालता यावे म्हणून लाखो रुपये खर्च करून पदपथ उभारले आहेत.  मात्र रस्त्याच्या कडेला बेकायदा वसलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या गॅरेज मालक, फर्निचर तसेच इतर दुकानदारांनी या पदपथांवर आपले बस्तान बसवले आहे. पालिकेकडून या दुकानदारांवर वारंवार कारवाई करूनही ते अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. 

कळवा : कळवा-खारीगाव परिसरातील कळवा-बेलापूर रस्त्यावर ठाणे महापालिकेने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने सुरक्षितपणे चालता यावे म्हणून लाखो रुपये खर्च करून पदपथ उभारले आहेत. त्यावर आकर्षक असे पेव्हरब्लॉक बसवले असून, नागरिकांना वाहनांच्या वर्दळीत हा मार्ग सोयीचा ठरत आहे; मात्र रस्त्याच्या कडेला बेकायदा वसलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या गॅरेज मालक, फर्निचर तसेच इतर दुकानदारांनी या पदपथांवर आपले बस्तान बसवले आहे. पालिकेकडून या दुकानदारांवर वारंवार कारवाई करूनही ते अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. 

कळवा-बेलापूर रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाशेजारील पदपथ, विटावा येथील पदपथावर तसेच खारीगाव परिसरातील दत्तवाडी येथील पदपथावर रस्त्याच्या कडेला पत्र्याचे शेड उभारून दुचाकी व मोठ्या वाहनांची गॅरेज उभारली आहेत. तसेच फर्निचरवाल्यांनी नवीन व जुने भंगारातील फर्निचर विकायला ठेवले आहे. या सर्व वस्तू दुकानात न ठेवता पादचारी मार्गावर ठेवले आहे. तसेच काही ठिकाणी गॅरेजवाल्यांनी या पदपथावर जुन्या गाड्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे रस्ता अडवला गेल्याने पादचाऱ्यांना मात्र रस्त्याच्या कडेने पायी जावे लागत आहे. 

या परिसरात मोठ्या शाळा असून, मुलांची व पालकांची मोठी वर्दळ असते. तसेच शाळांच्या बस, रिक्षा यांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीतही भर पडते. शालेय विद्यार्थी रस्त्यावरून चालताना अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना मोठी अडचण निर्माण होते. महापालिका आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी फेरीवाले व गॅरेजवाल्यांना पदपथावरून हटवून हे मार्ग मोकळे करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार कळवा प्रभाग समिती अतिक्रमण विभागाने कारवाई करून हे पदपथ मोकळे केले होते. मात्र "येरे माझ्या मागल्या'प्रमाणे पुन्हा या दुकानदारांनी आपले बस्तान रस्त्यावर, पदपथांवर बसवले आहे. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना "चिरीमिरी' देऊन हे दुकानदार पुन्हा नागरिकांचा मार्ग अडवत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी या दुकानदारांवर त्वरित कारवाई करून हे रस्ते मोकळे करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने बनवलेले हे पदपथ दुकानदारांनी अडवले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना खूप अडचण होते. या दुकानदारावर महापालिकेने कारवाई करावी. 
- बाबासाहेब पेंडसे, 
रहिवासी, दत्तवाडी-कळवा 

दुकानदारांनी बेकायदा पादचारी रस्त्यावर उभी केलेली वाहने व वस्तू हटवण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात येईल व नागरिकांची अडचण दूर करू. 
- विजयकुमार जाधव, 
सहायक आयुक्त, 
कळवा प्रभाग समिती  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rudeness of shopkeepers on footpath at Kalwa city near thane