अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा पराभव केला; सचिन सावंत यांचा फडणवीसांना टोला

कृष्ण जोशी
Friday, 4 December 2020

महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होते.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होते. अमर, अकबर, अँथनी जसा हिट चिटपट होता तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाल्याचे विधान परिषदेच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तसेच मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपासाठी ही मोठी चपराक असून दोन दिवसांपूर्वीच 105 चे 150 होतील, अशा वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा भ्रमाचा भोपळा या निकालामुळे फुटला आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला. 

हेही वाचा - वडिलांनी रागवल्यामुळे 16 वर्षाच्या मुलीने सोडलं घर! दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे पालकांच्या डोळ्यात पाणी

भाजपच्या रुपाने लोकशाही समोर मोठे संकट उभे आहे. यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. यातूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून, आजचे निकाल हे या तीन पक्षाच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपाचे 105आमदार कामी आले नाहीत. एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेस नेत्यामुळेच आली. विदर्भातील आपला गड फडणवीसांना सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडत आहेत. असेही सावंत यावेळी म्हणाले. 

Father Of Indian Navy |...म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत भारतीय नौदलाचे जनक!

आता ईडी, इन्कमटॅक्‍सला मविआ नेत्यांवर सोडतील 
मागील एक वर्षापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र द्रोहाचे काम करत आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगणा राणावत यांच्याबरोबर हा पक्ष वाहवत जात होता. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अवमान सातत्याने केला जात होता, तो रागही या निवडणुकीच्या निकालातून व्यक्त झालेला दिसला. असेही सावंत म्हणाले. भाजपाला आता भविष्यातील नामुष्की स्पष्ट दिसत असल्याने ऑपरेशन कमळला आता वेग येईल व ईडी, इन्कमटॅक्‍ससारख्या यंत्रणांना चवताळून मविआ नेत्यांवर सोडले जाईल, असेही सावंत म्हणाले. 

sachin sawant criticize to devendra fadanwis on graduate constituency mlc election result

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin sawant criticize to devendra fadanwis on graduate constituency mlc election result