सचिन वाझे प्रकरण: संजय राऊतांना भाजपच्या केशव उपाध्येंचा टोला

Sanjay-Raut
Sanjay-Raut

मुंबई: वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात वाझेंचा सहभाग असल्याचा ठपका ठेवत एनआयएने वाझेंना अटक केली. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने आधीच व्यक्त केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा लावून धरला. अखेर एनआयएने शनिवारी वाझेंना अटक केली. या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एनआयएच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलेल्या एका मुद्द्यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राऊतांना टोला लगावला.

मुंबई पोलीस दलातील अधिकारी असलेल्या सचिन वाझेंवर झालेल्या आरोपानंतरही संजय राऊतांनी वाझेंची पाठराखण केली. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यामुळेच सचिन वाझेंना या प्रकरणात गोवण्यात आलं असल्याची शंका त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. तसेच, अशाप्रकारच्या घटना पाहून हा राज्य अस्थिर करण्याचा डाव आहे, असंही ते म्हणाले. त्याच्या याच वाक्यावरून भाजपने त्यांना टोला लगावला. संजय राऊत यांच्या नावे एकच वाक्य सर्वाधिक वेळा बोलायचा विश्वविक्रम नोंदवला जाईल असं दिसतंय. ते वाक्य असेल 'हा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न आहे', अशा शब्दात त्यांनी राऊतांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

दरम्यान, सचिन वाझे यांच्या अटकेनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी त्यांची मतं व्यक्त केली. 'सचिन वाझे प्रकरणात महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एखाद्या व्यक्तिवर आरोप ठेवणं आणि ते सिद्ध होणं यात खूप मोठं अंतर आहे. सचिन वाझे मुंबई पोलीस दलातील यशस्वी अधिकारी आहेत. ते त्यांच्या तपास करण्याच्या कामात हुशार आहेत. अनेक गुन्हयांचा छडा लावला आहे", असं राऊत म्हणाले.

"काही महिन्यांपूर्वी सचिन वाझेंनी एका टीव्ही अँकरला खून, आत्महत्या प्रकरणात तुरुंगात टाकलं, टीआरपी घोटाळ्याचा जिद्दीने तपास केला. पण २० जिलेटिनच्या कांड्यांसाठी एनआयएचं पथक ज्या पद्धतीने मुंबईत आलं आणि तपास केला गेला, त्यावरुन त्यांना दहशतवादाचा तपास करायचा होता की फक्त सचिन वाझेला तुरुंगात टाकून राजकीय हिशोब पूर्ण करायचा होता हा प्रश्न पडतो", अशा शब्दात राऊतांनी या तपासाबाबत शंका व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com